धक्कादायक! सांगलीतील वृद्ध महिलेचा पुतण्याने दुसऱ्या राज्यात नेऊन केला खून

हायलाइट्स:

  • वृद्ध महिलेचा कोयत्याने वार करून खून
  • पुतण्यानेच केलं धक्कादायक कृत्य
  • पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

सांगली : जत तालुक्यातील उमदी येथील वृद्धेचा तिच्याच पुतण्याने कर्नाटकात कोलार येथे नेऊन कोयत्याने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. खुनाची घटना गुरुवारी (ता. १२) घडली. सुशीलाबाई राजाराम माने (वय ७४, रा. उमदी, ता. जत) असं मृत महिलेचं नाव आहे. संशयित आरोपी दादासाहेब माने हा फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुशीलाबाई माने यांना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुतण्या दादासाहेब माने हा भाड्याच्या कारने विजापूर येथे घेऊन गेला होता. दादासाहेब याने विजापुरात एक कोयता विकत घेतला. पुढे कोलार येथे उतरून सुशीलाबाई यांना पाहुण्यांच्या घरी सोडून येतो, असं सांगून कार चालकाला थांबवून तो गेला. त्यानंतर दोन तासांनी तो एकटाच आला.

सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजपा आमने-सामने; एकाच प्रकल्पाचे दोन वेळा भूमिपूजन

सुशीलाबाई यांना पाहुण्यांकडे सोडून आलो, असं त्याने चालकाला सांगितलं. मात्र त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग दिसल्याने चालकाला संशय आला. चालकाने गावी परत आल्यावर ही घटना चडचण पोलिसांना सांगितली. इतर कारचालक मित्रांनाही त्याने ही माहिती दिली.

दरम्यान, सुशीलाबाई यांच्या जत येथील जावयाने त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद उमदी पोलिसात दिली होती. त्यावरून उमदी पोलिसांनी माग काढला. मोटारचालकाला बोलावून घेऊन चौकशी केली. त्यानंतर शनिवारी कर्नाटकातील कोलार येथे जाऊन शोध घेतला असता, सुशीलाबाई माने यांचा मृतदेह उसाच्या फडात सापडला. त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे दिसून आले.

संशयित दादासाहेब माने फरार झाला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळत नसल्याने उमदी पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अडचणी आल्या. त्यामुळे तपासामध्ये विलंब होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Source link

murder casesangali newsसांगलीसांगली क्राइम न्यूजहत्या प्रकरण
Comments (0)
Add Comment