शिक्षण आणखी सोपं होणार; देशात २०० नवे शैक्षणिक चॅनेल, पुण्यात शैक्षणिक कुंभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘देशात २०० शैक्षणिक प्रसारवाहिन्या (चॅनेल) सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक राज्याला ४ ते ५ चॅनेल्स मिळतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला या चॅनेल्सच्या प्रसारणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिली.चौथ्या जी-२० शिक्षण कार्यगटाची आणि विविध देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर १७ ते २२ जून या कालावधीत पुण्यात होत आहे. या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत कुमार यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांसोबतच जी-२० शिक्षण कार्यगटाच्या बैठकीबाबत माहिती दिली. या वेळी उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. संजय मूर्ती, ‘आयसर’चे संचालक प्रा. संजीव भागवत आदी उपस्थित होते.

कुमार म्हणाले, ‘करोनानंतर शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण विनामूल्य मिळण्यासाठी शैक्षणिक चॅनेलची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यानुसार ती संख्या २००पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक राज्याला चार ते पाच चॅनेल मिळतील, या दृष्टीने आखणी करण्यात आली आहे. या चॅनेलच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकवण्यात येईल. हे सर्व फ्री टू एअर चॅनेल्स असल्याने, सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.’

‘विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी साधारण ७२०० समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे. देशात साधारण ७२०० ब्लॉक असून, त्या अंतर्गत अनेक शाळा कार्यरत आहेत. त्यामुळे येत्या काळात या शाळांना समुपदेशक मिळणार आहेत,’ असेही कुमार यांनी स्पष्ट केले.

जी-२० कार्यगटाची बैठक

१७ जून ते २२ जून : शैक्षणिक प्रदर्शन (शैक्षणिक प्रयोग, उपक्रम, तंत्रज्ञान प्रकल्प )
१७ आणि १८ जून : पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावर विविध राज्यांच्या सचिवांची परिषद
१९ जून : टीचिंग लर्निंग अॅप्रोचेस (सत्र पहिले), पॅरेन्टस् रोल : सोशिओ इमोशनल स्किल्स (सत्र दुसरे)
२० जून : हेरिटेज वॉक आणि जी-२० शिक्षण मसुद्यावर चर्चा
२१ जून : योग दिवस कार्यक्रम आणि जी-२० शिक्षणावर चर्चा
२२ जून : शिक्षणमंत्र्यांची बैठक

शैक्षणिक प्रदर्शनाचे
विद्यापीठात आयोजन

जी-२० परिषदेच्या निमित्ताने पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव स्टेडियममध्ये १७ ते २२ जून या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरील विनामूल्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देतील, असे नियोजन केल्याची माहिती जी-२० परिषद संयोजन समितीचे समन्वयक राजेश पांडे यांनी दिली. तीन ते नऊ वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिक्षण पद्धती; तसेच त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन शैक्षणिक साधनांचा प्रदर्शनात समावेश आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांचे कुतूहल जागृत करणारी साधने प्रदर्शनात पाहायला मिळतील. या साधनांमुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी कृतियुक्त शिक्षण देता येईल.
फर्स्ट डे ठरला वर्स्ट डे! शाळेच्या पहिल्या दिवशीच चिमुकले ५ तास रस्त्यावर, नाशिकमधील प्रकार

शैक्षणिक संस्थांची बैठक

प्रदर्शनाच्या अनुषंगाने पुण्यातील शैक्षणिक संस्थांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. आदित्य अभ्यंकर उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या शिक्षण विभागांच्या शाळांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी आणि शिक्षक प्रदर्शनाला भेट देणार आहेत. पीएमपीएमएलने त्यासाठी विनामूल्य बस व्यवस्था केल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले.

Source link

educational channelseducational newsG20 SummitPune newsSavitribai Phule Pune Universitytwo hundred educational channels
Comments (0)
Add Comment