हायलाइट्स:
- कोरेगावच्या ‘वाघ्या घेवडा’वर एका विशेष पाकिटाची निर्मिती
- जागतिक मानांकनापाठोपाठ आणखी एक मानाचा तुरा
- २०१६ मध्ये वाघ्या घेवड्याला मिळाला होता ‘जीआय टॅग’
स्वप्रील शिंदे | सातारा :
सातारकरांसह संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी एक अभिमानास्पद बाब समोर आली आहे. आधुनिक काळातही दळणवळणाचे महत्त्वपूर्ण साधन ठरत असलेल्या डाक विभागाकडून ‘वाघ्या घेवडा’वर एका विशेष पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सर्कल अंतर्गत सातारा डाक विभाग, पुणे क्षेत्र यांच्या मार्फत ही निर्मिती करण्यात आल्याने जागतिक मानांकनापाठोपाठ आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.
कोरेगाव तालुक्यातील देऊर इथं एका विशेष कार्यक्रमामध्ये पुणे क्षेत्राचे जनरल पोस्टमास्तर जी. मधुमिता दासजी यांच्या हस्ते या पाकिटाचे अनावरण करण्यात आलं.
नक्की कसा असतो वाघ्या घेवडा ?
वाघ्या घेवडा हा राजमाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये गुलाबी रंग आणि पट्टे आहेत. या घेवड्यावर वाघाच्या अंगावर असणाऱ्या पट्ट्यांसारखे पट्टे असतात म्हणून याचं नाव ‘वाघ्या घेवडा’ असं पडलं आहे. तसंच एक पोषक कडधान्य म्हणूनही वाघ्या घेवड्याची ओळख आहे. २०१६ मध्ये वाघ्या घेवड्याला ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.
भारतीय डाक विभागाने या वाघ्या घेवडावर स्पेशल कव्हर प्रसिद्ध केल्याने वाघ्या घेवड्याचा ‘आंतरराष्ट्रीय स्पेशल कव्हर व तिकीट’ या जागतिक वारशामध्ये समावेश झाला आहे. सातारा जिल्ह्यासह राज्यासाठी ही एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब समजली जात आहे.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी पोस्टमास्तर जनरल पुणे क्षेत्र जी. मधुमिता दासजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जय तुळजाभवानी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष मधुकर कदम उपस्थित होते.