हायलाइट्स:
- मनसेने टास्क फोर्सला विचारले अनेक प्रश्न.
- संजय ओक यांनी लगेचच दिले लेखी उत्तर.
- लॉकडाऊन, शाळांबाबत भूमिका केली स्पष्ट.
मुंबई: करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील शाळा सुरू करू नयेत, अशी सूचना टास्क फोर्सने राज्य सरकारला केली आहे, अशी माहिती कोविड टास्क फोर्स अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘मनसे’ला दिली आहे. ओक यांनी टास्क फोर्सच्या कार्यपद्धतीसह विविध बाबींवरही यानिमित्ताने प्रकाश टाकला आहे. ( Covid Task Force On MNS Questions )
वाचा:मॉलमध्ये लहान मुलांना असा मिळणार प्रवेश!; राज्य सरकारचा सुधारित आदेश
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या विविध प्रकारच्या निर्बंधांबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देशपांडे यांनी त्यांना त्यांनी पत्र दिले आहे. त्याला डॉ. ओक यांनी लेखी पत्राद्वारे उत्तर दिले असून त्यात विविध बाबी स्पष्ट केल्या आहेत. ‘शाळा सुरू करण्यासाठी वर्गातील मुलांचे दोन गट करून आठवड्यातून प्रत्येकी दोन दिवस शाळा सुरू करता येईल का,’ असा प्रश्न देशपांडे यांनी केला होता. त्यावर डॉ. ओक यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची शिक्षण समितीसोबत १० ऑगस्ट रोजी चर्चा झाली. या बैठकीत सप्टेंबरअखेरपर्यंत शाळा सुरू करू नयेत, तसेच ५० टक्के विद्यार्थी संख्येचा प्रयोग सप्टेंबरनंतर करता येईल, असे स्पष्ट केले आहे. बालरोग टास्ट फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनीही या सूचनेला पाठिंबा दिला असल्याचे ओक यांनी पुढे नमूद केले आहे.
वाचा:महाराष्ट्रात पाच कोटी लसवंत!; ही विक्रमी कामगिरी करणारं दुसरं राज्य
करोना रोग, त्याचे उपचार व आरोग्यावर होणारे परिणाम यावरच विचार होताना दिसत असून, या पलीकडे सगळ्याचा रोजच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जात नाही. टास्क फोर्समध्ये अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, माहिती विश्लेषक, शिक्षणतज्ज्ञ यांचाही समावेश करणे आवश्यक आहे, असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले असून, त्यावर टास्क फोर्स आपल्या साप्ताहिक बैठकांमध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञांना आमंत्रित करते. त्यांच्याशी चर्चा करून टिपणे बनवली जातात. ही टिपणे राज्याचे मुख्य सचिव व आरोग्य सचिवांना पाठवली जातात, असे ओक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊनचा निर्णय ऑक्सिजनच्या निकषावर
राज्यातून करोना संबंधीची माहिती आपल्या आरोग्य विभागाकडे येत असून, तिचे रोजच्या रोज विश्लेषण केले जाते. लॉकडाऊनचा निर्णय अपरिहार्य ठरलाच, तर त्याची सांगड राज्यातील (३० हजार खाटा आणि ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन) ऑक्सिजनच्या निकषावर केली जाईल. त्याचा निर्णय शासकीय पातळीवर होईल, असे डॉ. ओक यांनी नमूद केले आहे.
वाचा:करोना: मुंबईकरांना मोठा दिलासा; पाहा, मुंबई ठाण्यात अशी आहे ताजी स्थिती!