रक्षाबंधन तिथी आणि मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, यावेळी बुधवारी, ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकालात राखी बांधू नये, हे ध्यानात ठेवावे. वास्तविक, भद्रकालमध्ये अशुभ मुहूर्त आहे. म्हणूनच बहिणींनी आपल्या भावांच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी.
पौर्णिमा तिथी ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटापासून सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८ वाजून ३५ मिनिटापर्यंत असेल.
रक्षाबंधनाचे पौराणिक महत्व
एकदा दानवांचा राजा वृत्रासुर याने इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले. इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला. इंद्रदेवाला विजय मिळावा यासाठी पत्नीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. हा दोरा म्हणजेच राखी होय, या राखीने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि इंद्राचे गेलेले वैभव त्याला पुन्हा मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, अशी हिंदू परंपरेत मान्यता आहे.
महाभारतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झाल्याने रक्त वाहत होते. यावेळी द्रौपदीने तिच्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली यामुळे त्याचा रक्तस्राव थांबला. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रोपदीचे आजीवन रक्षण करण्याचा संकल्प केला, असे महाभारतात सांगितले आहे.
नारळी पौर्णिमा
यंदा ३० ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले जाते.