अंत:करण शुद्ध असल्यामुळं वाणीत मधुरता येते. मधुर वाणी हृदयापर्यंत पोहोचते. वाणीत तसे रस, भाव, अलंकार इत्यादी अनेक घटक असतात. सिद्धान्त आणि संशोधनदेखील वाणीच प्रकट करते. दैनिक व्यवहार वाणीनंच चालतात. खूप काही घटक आहेत; परंतु आपण केवळ वाणीच्या पावित्र्यावर विचार करीत आहोत, शब्दब्रह्माला प्रकट करणारी वाणी नेहमी पवित्र असते. पवित्र शब्दाचा अर्थ वाणीत तेज असणे होय. वाणीतील सत्व निघून जाता कामा नये. मन आणि बुद्धीला रंजवणारी वाणी अलंकृत असते. रसपूर्ण, भावपूर्ण असते. पवित्र वाणी हृदयात उतरते. नारदाच्या वाणीनं रामायणाचा लेखक जन्माला घातला. इथं कोणता तर्क वापरला, शब्द कोणते होते, हे महत्त्वाचं नाही. वाणी शुद्ध असल्यामुळं हृदय परिवर्तन झालं. घरातील माणसं जन्माला आल्यापासून चांगलंच सांगतात; तरीही मुलं बिघडतात. बिघडवणारे कुशल आहेत, हुशार आहेत. मुलांचं वर्म त्यांना माहीत आहे. त्यांच्याबरोबर कसं बोलावं हे माहीत असतं. असं असलं, तरी ही वाणी पवित्र आहे, असं म्हणता येत नाही. वाणीतील तेज अयोग्य माणसांची स्तुती केल्यामुळं नष्ट होतं. असत्य भाषण, संतनिंदा, द्वेष, मत्सर, लाळघोटेपणा इत्यादी वाणीला निकामी करतात. अनेक जण चांगलं बोलतात, भाषण करतात. उच्चार शुद्ध आहेत, प्रभाव पडतो; भाव हृदयात स्थिरावत नाही. शुद्ध वाणीचे शब्द साधे असतात; परंतु परिणामकारक असतात. त्याचा शापही लागतो आणि आशीर्वादानं कल्याणही होतं.
‘महिम्न’ नावाचा पुष्पदन्ताचार्यरचित जगप्रसिद्ध स्तोत्र ग्रंथ आहे. सर्वमान्यही आहे. हरिपाठाप्रमाणं संन्यासी रोज नित्यनेमानं म्हणतात. त्यात वाणीविषयक बोलताना ते म्हणतात,
मधुस्फीता वाच: परमममृतं निर्मितवत।
स्तव ब्रह्मन् कि वागपि सुरगुरोर्विस्मयपदम।।
मम त्त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवत:।
पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता।।३।।
मधुमधुर, अमृतमयी वाणी निर्माण करणारे आपण… ‘सुरगुरू बृहस्पती वा स्वयं ब्रह्मा’ आपली स्तुती करीत असतील, तर ते तुम्हाला विस्मयात पाडू शकत नाहीत. ते जर असमर्थ आहेत, मग मी तर सामान्य आहे. माझी वाणीदेखील सामान्यच असणार. हे माहीत असूनदेखील मी माझ्या बुद्धीला स्तुती करायला लावत आहे; कारण माझी वाणी तुमच्या गुणवर्णनानं ‘पुनाम् इत्येर्थेस्मिन्’ पुनीत होईल, पवित्र होईल, म्हणून ती बुद्धीला आपल्या सेवेत लावत आहे. कविता गोड वाटतात. त्यांना राजकीय आश्रय असतो; पण त्या फार काळ तग धरत नाहीत. ओव्या आणि अभंग यांचा भंग होत नाही. वाणी टिकावी यासाठी संतस्तुती असते. मन पवित्र होतं. भक्तीभाव वाढीस लागतो. आतला आत्मा शब्दात उतरून वाणीला अजरामर करतो.
महाराष्ट्रावर श्रीनामदेव महाराजांचे उपकार आहेत. सातशे वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं हे नामदेव महाराजांमुळं जगाला माहीत होतंय. माऊलीचं संपूर्ण जीवन नामदेव महाराजांनी आपल्या वाणीतून काव्यबद्ध केलं. वारकऱ्यांनी पाठ करून पिढ्यान्पिढ्या जपलं, म्हणून आज महाराष्ट्राला मिळालं. विठ्ठलाच्या भक्तीनं पुनीत झालेल्या वाणीला, माऊलीच्या जीवनाचा सुगंध मिळाला. वाणी केवळ पुण्यवान झाली असं नव्हे, तर येणाऱ्या प्रत्येक माणसाला तिनं पवित्र केलं. आजही करीत आहे, पुढंही करणार. हे नामदेव महाराजांचं भाग्य म्हणावं, त्यांच्या डोळ्यांनी माऊली पाहिले, हातांनी स्पर्श केला. घरात माऊलीला प्रसाद खाऊ घातला. जगाला माऊलींचा इतिहास दिला. चरित्र दिलं. वारकरी रोज दुपारी माऊलीचे समाधी महिमेचे अभंग म्हणतात. ‘समाधी महिमा’ या प्रकरणात माऊलीचा प्रत्येक क्षण टिपला आहे. त्या क्षणाची आठवण म्हणून दोन अभंग रोज गातात. अडुसष्ट अभंग आहेत. दुपारच्या भजनात हा महिमा गायल्यानं गारवा मिळतो. माऊलींचं जीवन आपल्या वाणीत येऊन, आपलीही वाणी पवित्र होते. दिंडीत ‘समाधी महिमा’ गाताना कळतं, ‘ज्ञानदेव हाचि देव’ आहे. ज्ञान संजीवन आहे. अज्ञानाला जीवन देणारे आहेत. ते कळावेत, म्हणून दिंडीत या अभंगावर लक्ष द्या.