जीवन हे काळामुळं गतिमान आहे. गती समजते; परंतु काळ समजत नाही. वैज्ञानिक असं म्हणतात, की संपूर्ण ब्रह्मांड गतिमान आहे. गती देणारा कोण आहे, हे माहीत नाही. संत गती देणाऱ्या तत्त्वाला ‘देव’ म्हणतात. त्या देवाचं स्वरूप ‘काळ’ आहे, असं आपल्याला सांगतात. माणसाला दंड काळ देत असतो. काळाचा सदुपयोग आणि दुरूपयोग करता येतो. काही वेळेपुरता काळ माणसाला स्वातंत्र्य देत असतो. त्याचा वापर आणि जाण क्वचित माणसाला असते. ज्याला नसते, त्याची वाईट गती होते. काळतत्त्व समजणं, हे सामान्यांचं काम नाही. योग्य परिश्रम आणि योग्य ध्येय माणसाची चांगली वेळ आणतात. चांगली वेळ कुठपर्यंत टिकावी, हे काळाच्या हातात आहे. चांगली वेळ सदैव नसते, हे माणसांचं म्हणणं असतं. या म्हणण्याला माणसंही मानतात. न कळणाऱ्या जीवनाला काहीही मान्य असतं, म्हणून त्यांच्यावर कोणाचाही प्रभाव पडतो. ज्यांचा प्रभाव पडतो, त्यांचे हे बौद्धिकदृष्ट्या गुलाम होतात. गुलामांना स्वतंत्र विचार करण्याची मुभा नसते; किंबहुना स्वतंत्र विचार करीत नसतात. आपण ज्या समूहात वावरतो, तो समूह गुलाम आहे, की स्वतंत्र विचाराचा, आहे हे बुद्धिमंतांना समजलं पाहिजे. समजणंच ज्यांनी गहाण ठेवलंय, त्यांच्याबद्दल बोलून काहीही उपयोग नाही. समजणं गहाण ठेवणाऱ्या लोकांचा समूह आहे. अमुक एका विचारात ते संपूर्ण जीवन जगतात. इतरांचं स्वातंत्र्यही त्यांना खटकत असतं. इतरांचे चांगले विचार त्यांना मान्य नसतात. त्यांची पारख करण्याची क्षमता नसते. ही क्षमता वाढू नये, म्हणून समूहाचे आधिकारी सतत प्रयत्नरत असतात. वैचारिक गुलामी हीच सर्वश्रेष्ठ आहे, असं मानणारी आणि काही तरी चमत्कारिक घडेल या अंधश्रद्धेवर जगणारी ही गुलाम मंडळी असतात.
संत हे गती देणाऱ्या काळतत्त्वाचे लाडके असतात. त्यांना काय हवंय, ते काळतत्त्वच पुरवत असतं. कर्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी, संतसमुदाय आनंदात असताना, वयाच्या बावीसाव्या वर्षी माऊली आपलं मनोगत अभिव्यक्त करतात, ‘देवा, मला तुझ्याजवळ समाधी घ्यायची आहे.’
‘ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी। समाधान तूंचि होसी।
परी समाधी हे तुजपासी। घेईन देवा।।’
भुक्ती आणि मुक्ती मला नकोय. ‘तुझ्या चरणाची आर्ती। थोर आथी।।’ तुझ्या चरणात लीन व्हावं अशी इच्छा आहे. वारकरी संप्रदायात चरण शब्दाचा अर्थ स्वरूप असा होतो. अर्थात, तुझ्या स्वरूपात एकरूप व्हावं, असं माऊली म्हणतात. जनसामान्यांना वैचारिक स्वातंत्र्य देणाऱ्या माऊलीचं, स्वतंत्र अस्तित्व असावं, असं काळतत्त्वाला वाटलं, जे सावळ्या विठ्ठलाच्या स्वरूपात पंढरीत आहे. त्यांनी माऊलींना सांगितलं, आपण अलंकापुरला जावं. आपल्या समाधीचं स्थान तेच आहे. ज्यांनी संपूर्ण निर्गुण तत्त्व हाती दिलं, ते श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज मस्तकावर हात ठेवण्यासाठी हजर असावेत. संतसमुदाय ओल्या डोळ्यांनी माऊलीला पाहत होता. काळतत्त्व समाधीची संपूर्ण व्यवस्था करीत होतं. याला खऱ्या अर्थानं जीवनाची सांगता म्हणतात. माऊली हे राजयोगी आहेत. वयाच्या बावीसाव्या वर्षी समाधी स्वीकारतात. जगात एकमेव समाधी अशी आहे, जिला सौभाग्यवती समाधी म्हणतात. श्रीगुरूच्या अगोदर माऊली समाधी घेतात, यालाच सौभाग्यवती समाधी म्हणावं. आपल्यासाठी रडणारं असावं, आपल्यावर रडण्याची वेळ येऊ नये.
माऊलीच्या वैचारिक जीवनाचा स्पर्श आपल्या मस्तकाला व्हावा, यासाठी दुपारच्या भजनात समाधी महिमा हे प्रकरण वारकरी रोज गातात. ‘समाधी महिमा’मध्ये नामदेव महाराजांनी आपलं अंत:करण प्रकट केलं आहे. माऊलीचा वियोग सहन न झाल्यानं, नामदेव महाराज पंजाब या प्रांतात घुमान या गावी निवास करतात. शीख संप्रदायाच्या गुरुवाणीत नामदेव महाराजांचे अभंग आहेत. गुरू नानक यांच्यासाठी ते आदरणीय आहेत. नामदेव महाराजांच्या अंत:करणाची अवस्था पाहा,
कैसा होय तुझा दास। कैसी पाहू तुझी वास।
ज्ञानाकारणे कासावीस। जीव माझा होतसे।। समाधी महिमा.
प्रेम आणि ज्ञान यांचा संयोग नामदेव महाराजांत आहे. त्याचा संयोग वारकऱ्यांच्या सहवासात येतो.