वादग्रस्त संवाद , व्हिएफएक्समुळं टीका आणि विरोध झाल्यानंतर निर्मात्यांनी तत्काळ काही बदल करण्याचा निर्मण ही घेतला. हनुमानाच्या तोंडी असलेल्या संवादामुळं वाद निर्माण झाला होता. याची दखल घेतल लेखक आणि निर्मात्यांनी हे संवाद आता बदलले आहेत. ‘कपडा ते बाप का तो जलेगी भी तेरी बाप की’ असा संवाद हनुमानाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या पात्राच्या तोंडी होता. तो बदलून ‘ कपडा तेरी लंका का तो जलेगी भी तेरी लंका’ असा करण्यात आला आहे. काही संवाद बदलण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि या आठवड्यापर्यंत बदललेले संवाद जोडण्यात येतील, असं संवाद लेखक मनोज मुंतशिर शुक्ला यांनी रविवारी जाहीर केलं होतं.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर दोन दिवस आदिपुरुष चित्रपटाच्या तिकिटाच्या किंमती या जास्तच होत्या. मल्टीप्लेक्स सिनेमागृहांत थ्रीडीमध्ये चित्रपट पाहायचा असेल तर, तब्बल २००० रुपयांहून जास्त किंमत मोजावी लागत होती. सिनेमा थ्रीडी असल्यानं इतर सिनेमांपेक्षा चित्रपटाच्या तिकिटाच्या किंमती जास्त होत्या. त्यामुळं सामान्य प्रेक्षकांना हे परवडणार नाहीये, हे लक्षात येताच आता निर्मात्यांनी तिकिटांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. तिकिटांचे दर आता काही ठिकाणी १५० रुपयांपर्यंत कमी केल्याचं म्हटलं जात आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठी सूट ( Discount ) देण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, आदिपुरुष या वादग्रस्त चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयानं बुधवारी नकार दिला. चित्रपट आधीच प्रदर्शित झाला आहे, याकडं न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे लक्ष वेधलं.
या प्रकरणात कोणतीही घाई नाही आणि त्यावर ३० जून रोजी सुनावणी घेतली जाईल, असं न्यायमूर्ती तारा वितस्ता गंजू आणि अमित महाजन यांच्या खंडपीठानं सांगितलं. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे