हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर टीका
- राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर
- अमित शहांनी भेट का नाकारली यावर आत्मचिंतन करा – चाकणकर
पुणे: ओबीसी आरक्षण व आमदार नियुक्तीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यांवरून केंद्र सरकार व राज्यपालांवर टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर टीका केली होती. पाटील यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बोचऱ्या शब्दांत उत्तर दिलं आहे. (Rupali Chakankar Taunts Chandrakant Patil)
आरक्षणासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयक मांडून केंद्र सरकारनं ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्याचा लोकांचा समज झाला आहे. पण प्रत्यक्षात जेवणाचं आमंत्रण देऊन हात बांधले आहेत. जोपर्यंत आरक्षणावरची मर्यादा उठवली जात नाही, तोपर्यंत या घटनादुरुस्तीचा काहीही उपयोग होणार नाही,’ असं पवार यांनी काल मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच, १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोलाही हाणला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.
वाचा: आता अनिल देशमुख काय करणार? ईडीनं पुन्हा उचललं ‘हे’ पाऊल
‘तब्बल ५८ वर्षे सत्ता हाती असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पवारसाहेबांचे हात कुणी बांधले होते का? आता हा प्रश्न आपल्यावरच शेकणार हे समजल्यावर ते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. जे स्वतःला जमत नाही त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडायचे या खेळीला महाराष्ट्र बळी पडणार नाही,’ असं पाटील म्हणाले होते. पवारांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेवरही पाटील यांनी टिप्पणी केली होती. चाकणकर यांनी व्हिडिओ ट्वीट करून पाटील यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
वाचा: महाराष्ट्रात आणखी एक बुलेट ट्रेन; रावसाहेब दानवे यांचे संकेत
‘त्यांचं जितकं वय आहे, तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे, हे व्हाया कोथरूड आमदार झालेल्या चंद्रकांतदादांनी लक्षात घ्यावं. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी भेट का दिली नाही ह्यावरही त्यांनी आत्मचिंतन करावं, म्हणजे कुणाबद्दल काय बोलावं याचं भान येईल,’ असा टोला चाकणकर यांनी हाणला आहे.