माऊलींचा प्रश्न अन् नामदेव महाराजाचं उत्तर, वारीतला महाप्रसाद

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री

‘नामयाचे भेटी ज्ञानदेव आले। लोटांगण घातले नामदेवे।।’ तीर्थयात्रा करावी, म्हणून माऊली प्रेमभंडारी नामदेव महाराजांच्या घरी जातात. ज्ञानदानानं साधकाला तृप्त करून, संतांना अनुभवामृत देऊन, योगी चांगदेवाला पासष्टीचा प्रसाद देऊन, सूत्ररूपानं हरिपाठ लिहून झाल्यावर उर्वरित काळात ‘भूतळीचे तीर्थ पाहावी नयनी’ असं माऊलींना वाटलं. माऊलींनी सोबत म्हणून नामदेव महाराजांना निवडलं. आध्यात्मिक अर्थ काही वेगळे आहेत. ज्ञानाला प्रेमाची सोबत हवी. माऊली योगी आहेत. समाधी सुख माऊलीला शोधत आलं आहे. ज्ञानाचा अवतारच आहेत; तरीदेखिल मित्र असला पहिजे. सहवास चांगलाच हवा. माऊलींनी अनेक ठिकाणी आपली आवड बोलून दाखवली आहे. ‘ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी।’ ‘साधूचे संगती तरणोपाय।’ प्रेमाच्या सहवासात दु:खाचा प्रभाव पडत नाही. अनुवादात आणि संवादात दिवस छान जातात. तोंडभरून बोलण्यासाठी मित्र असावा. फार कमी लोकांना माहिती आहे, प्रेमात क्रियेपेक्षा संवादात आनंद असतो. एकत्रित असण्यात रस असतो, म्हणून रसात्मक बोलणं आपोआप येतं. संवाद हा शब्दातून असतो, हे आधुनिक ज्ञान्यांचं मत आहे. प्रेमात डोळे बोलतात. शब्दाशिवाय संवाद होतो. हृदयाची भाषा हृदयाला समजते, हे प्रेमी भक्तांचं मत आहे. अर्थात, ज्ञानी असणाऱ्यांना हा अनुभव नसतो. इथं बुद्धीपेक्षा हृदय महत्त्वाचं असतं. ज्ञानापेक्षा प्रेम महत्त्वाचं आहे. तसा हा अनुभवाचा विषय आहे. असो.

जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन।
तरी देव तीर्थ भजन न सांडीती।। तीर्थावळी.

संतांचा स्वभाव सांगतात; कृतार्थ झाल्यावर देव, तीर्थ आणि भजन यांचा ते त्याग करीत नाहीत. जीवमुक्त, ज्ञानी, भक्त आणि संत तीर्थांना पवित्र करण्यासाठी जातात. माऊली नामदेवरायांना म्हणतात ‘तुझिये संगतीचे नित्यसुख घ्यावे।’ हा विषय खूप सखोल आणि हृदयस्पर्शी आहे. संगतीत कोणीही असतं; पण संगतीचं सुख मिळत नसतं. पती-पत्नी आहेत, मित्र आहेत, पिता-पुत्र आहेत, गुरू-शिष्यादी आहेत. एकत्रित; किंबहुना संगतीत असल्यामुळं शब्दांच्या जोड्या निर्माण झाल्या आहेत; पण संगतीचं नित्यसुख आहे का, हा विचारण करण्याचा विषय आहे. सर्व स्तरांतील माणसासाठी हा प्रश्न आहे. उत्तर आपण आपलंच स्वीकारावं. नामदेव महाराज फार संकोचले. देवाचा विरह त्यांना नको होता. माऊलीपुढं काही बोलताही येत नाही. बोलल्याशिवाय काही पर्याय नाही. संवाद कसे असावेत, याचं उत्तम उदाहरण ‘तीर्थावळी’ प्रकरण आहे. माऊली विचारतात आणि नामदेव महाराज उत्तर देतात. ज्ञानाला उत्तर प्रेम देतं. नामदेव महाराज म्हणतात, ‘पाळिलो पोशिलो जन्मोनि जयाचा। विकिलो काया वाचा मने त्यासी।।’ काही पालन करतात; पण पोसत नाहीत. काही कामासाठीच पोसतात, पालन करीत नाहीत. पालन करणं म्हणजे रक्षण करणं, सांभाळणं आणि पोसणं म्हणजे बौद्धिक, मानसिक, कायिक बलसंपन्न करणं. नामदेवराय म्हणतात, मी काया, वाचा, मन विकलं आहे. माझी माझ्यावर सत्ता नाही. आपल्यासोबत न्यायचं असेल, तर ‘नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा। आज्ञा देईन शिरसा वंदीन त्यासी।।’ माऊलीला हे उत्तर फार आवडलं. आलिंगन दिलं. ‘देऊनि आलिंगन नामा धरिला करी।’ नामदेवराय किती भाग्यवंत आहेत! माऊलीचा स्पर्श मिळाला. देव स्वत: म्हणतात, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर यांच्या शरीराचा स्पर्श झाला. संसारिक लोकांना हे भाग्य मिळत नाही. विचारवंतांच्या स्पर्शात आनंदी आयुष्य जातं. हा तर प्रत्यक्ष परब्रह्माचा स्पर्श आहे.

ऐसे भाग्य जेणे सर्वस्व साधावे।
तरीच जन्मा यावे विष्णुदासा।। तीर्थावळी.

‘तीर्थावळी’ प्रकरणात अभंग मोठे असून, संवादही मोठे आहेत. आशय गहन आहेत. रसिकांनी प्रत्यक्ष हे प्रकरण अभ्यासावं. अठ्ठावन्न अभंगाचं ‘तीर्थावळी’ प्रकरण नामदेव महाराज विरचित आहे. दुपारच्या भजनात रोज दोन अभंग गायले जातात. वारकऱ्याच्या सहवासात जे असतात, त्यांना हा लाभ होतो. दिंडीत चालताना या महाप्रसादाकडे लक्ष असावं.

Source link

Abhangashadhi wari 2023dr namdev shastritirthaveli abhangआषाढी वारी २०२३डॉ. नामदेव शास्त्रीतीर्थयात्रातीर्थावळीसंत ज्ञानेश्वर
Comments (0)
Add Comment