हायलाइट्स:
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परत केले सरकारी मोबाइल
- कर्जत तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा निर्णय
- अद्ययावत हँडसेट मिळावेत अशी केली मागणी
अहमदनगर: अंगणवाडी सेविकांचे कामकाज ऑनलाइन करण्यासाठी सरकारने त्यांना मोबाइल हँडसेट पुरविले होते. मात्र, दोन वर्षांत काम वाढत गेले आणि मोबाइलची क्षमता कमी पडत केली. त्यातच दुरुस्तीचा खर्च परवडेना यामुळे कर्जत तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांना सरकारने दिलेले मोबाइल हँडसेट परत केले. (Anganwadi Workers Returned Mobiles to government)
वाचा: समुद्रकिनारी अनधिकृत बंगले? मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या
सुमारे दोन वर्षांपूर्वी दिलेले हे मोबाइल त्रासदायक ठरू लागल्याने तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस ३८१ मोबाइल हँडसेट घेऊन बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. तेथे त्यांनी आपल्याकडील मोबाइल परत केले. यामध्ये सुनीता कुलकर्णी, अनिता धस, रजनी निंबोरे, कांता घोडके, कृष्णा शिंदे, प्रमिला कांबळे, चंदा अनारसे, शोभा थोरात, दिपाली गावडे, स्वाती जाधव यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सांगितले की, सरकारी कामासाठी हे मोबाइल आम्हाला देण्यात आले होते. या मोबाइलची वॉरंटी दोन वर्षे होती, ती संपली आहे. मोबाइल अवघ्या दोन जीबी रॅमचा आहे. त्या तुलनेत लाभार्थ्यांची भरायची माहिती खूप जास्त आहे. यामुळे मोबाइल हँग होतात. लवकर गरम होतात. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे मोबाइल आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी तीन हजारापासून आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अंगणवाडी सेविकांकडून घेतला जात आहे. केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे. मात्र, सरकारने दिलेल्या मोबाइलमध्ये हे ॲप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खासगी मोबाइलमध्ये ॲप डाऊनलोड करावे लागत आहे.
वास्तविक पाहता आपली मातृभाषा मराठी आहे. यामुळे या हँडसेटमध्ये बनवायची माहिती देखील मराठीतून असावी. इंग्रजीमुळे माहिती भरण्यास अनेक अडचणी येत आहेत. याचा निषेध करत आम्ही सर्व हँडसेट सरकारला परत करत आहोत. आम्हाला नवीन चांगले अद्ययावत हँडसेट मिळावेत व त्यामध्ये माहिती भरण्यासाठी मराठीचा वापर प्रामुख्याने व्हावा, असे महिलांनी सांगितले.
वाचा: अमित शहांनी भेट का नाकारली ह्याचं आत्मचिंतन करा; राष्ट्रवादीचा चंद्रकांतदादांना टोला