जगात देवी-देवता अनंत आहेत. त्यांचे भक्तही अनंत असून, श्रीमंत आहेत. मुळात देवाला महत्त्व कशामुळं, हेच जनसामान्याला माहीत नाही. भारतासह संपूर्ण पृथ्वीवर शक्तीविषयीच्या अनेक संकल्पना आहेत. काही जुने आहेत, म्हणूनच मान आहे. काही विशिष्ट जातीचे आहेत, म्हणून श्रद्धा आहे. काही देव पावतात, तर काही देवी खरूज-नायटा बरा करतात. कुळदेवता, धर्म देवता, इत्यादीही असतात. काही देवता शाकाहारी आहेत, तर काही देवता पशुहत्या मागतात. धर्माच्या नावानं परंपराही पाळतात. नेमकं हे देवालाच लागतं, की माणसं देवाच्या नावानं मौज करतात, यावर विचार करायला हवा; परंतु ज्यांच्याकडून विचाराची अपेक्षा आहे, ते विचाराला मान देतच नसतात. त्यांच्या दृष्टीनं श्रद्धा महत्त्वाची असते. करायचं म्हणजे करायचं. ज्या देवाला स्वत: खाता येत नाही, त्याला माणसं खाऊ घालतात. आश्चर्य आहे! माणसाला काही मागणारा देव हा भिकारीच म्हणावा. सामान्य माणसांनी देवाला आपल्या पद्धतीनं सामान्य मानलं आहे. धर्म काय अन् पंथ काय, ज्यांनीत्यांनी आपआपल्या पद्धतीनं देवाचं स्वरूप मानलं आहे. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ।। गी. ९-११
मूर्ख माणसं मला ओळखत नाहीत. माणसाप्रमाणं मला समजतात. या श्लोकावरील माऊलीचं मत स्वत: अभ्यासावं, मग सत्यता लक्षात येईल. माणसं देवाला मानतात, का अपमान करतात, हेच लक्षात येत नाही. पुढील ओवीचं मनन आवश्यक आहे.
या उपाधीमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत।
ते तत्त्वज्ञ संत। स्वीकरिती।। ज्ञा. २-१२६
संत कोणाला समजावं, याचं या ओवीत विश्लेषण आहे. सर्वव्यापी चैतन्य हे देहासह जगाच्या उपाधीत गुप्तरूपानं आहे. तत्त्वज्ञ संत त्याचा स्वीकार करतात. मुळात तत्त्व जाणणारा संत असावा. उपाधीत गुप्त असणारं चैतन्य त्यानं ओळखावं. तेच चैतन्य ‘हे’ आहे, म्हणून दाखवावं. राजयोगी श्रीज्ञानेश्वर महाराजांनी, ‘ब्रह्म’ म्हणून श्रीविठ्ठलाला दाखवलं. सर्व संतांसह भक्तांनी, जनसामान्यांनी ‘ईश्वर’ म्हणून श्रीविठ्ठलाचा स्वीकार केला. दाखवणारा कोण आहे, याला महत्त्व आहे. ज्ञानचैतन्यांनी ब्रह्मचैतन्याची ओळख करून दिली. ‘तो हा विठोबा निधान। ज्याचे ब्रह्मदिका ध्यान।।’ ध्यानासाठी देव आहे. नवस आणि पशुहत्येसाठी नाही. देव ज्ञानानं जाणला पाहिजे, देवाला वस्तू नकोत. ज्या आहेत, त्या त्याच्याच आहेत. त्यानंच निर्माण केल्या आहेत. तो भावाचा भुकेला आहे. प्रेम त्याचं संपर्क साधन आहे. समर्पण त्याची पहिली पायरी आहे. यशिवाय त्याला काही देणं, म्हणजे आपण दाता आहोत आणि तो घेणारा आहे, असा अर्थ होईल.
चैतन्य जर सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे, मग श्रीविठ्ठलालाच का मानावं? तिथंच दर्शन का घ्यावं? शंका येणं स्वाभाविक आहे. संतसहवास न लाभलेल्या माणसांना आणखी काय येणार? आई संपूर्ण शरीरात असते; परंतु दूध स्तनात असतं. माऊलींनी सर्वव्यापी चैतन्याचं प्रकट स्थान दाखवलं आहे. आपण पाहतो तो आपला श्रीविठ्ठल आहे. आपली अनुभूती आहे. तिथंच माऊलीची अनुभूती वेगळी आहे. माऊली म्हणतात, मी आलिंगन द्यायला गेलो; ‘क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।’ पायाही पडता येईना, ‘पाया पडु गेले तव पाऊलचि न दिसे।’ मग तिथे चैतन्य नाही का? ‘उभाचि स्वयंभु असे।’ अशा श्रीविठ्ठलाला कसं पाहावं. माऊली म्हणतात ‘दृष्टिचा डोळा पाहो मी गेले। तव भीतरी पालटु झाला।।’ आतला पालट करणारा श्रीविठ्ठल आहे. माणसं आतून दु:खी आहेत. हिंस्र आहेत. श्रीविठ्ठलाची भक्ती आतून परिवर्तन करते. आत ज्ञानप्रकाश करणारा श्रीविठ्ठल हा सर्वसामान्यांच्या हृदयात निवास करतो. ‘हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वी।’ त्याचं प्रकटीकरण पंढरीत होतं. विटेवर उभा असणारा परमात्मा अविट आहे. त्याला भेटण्यासाठी आषाढी वारी आहे. संतांसह चैतन्याच्या भेटीचं ठिकाण, म्हणजे श्रीक्षेत्र पंढरपूर होय. उपाधीत गुप्त असणाऱ्या चैतन्याला माऊलींनी प्रकट केलं, म्हणून जास्त महत्त्व आहे.