गुरुपौर्णिमा २०२३: ‘हे’ सात गुरु-शिष्य कायम स्मरणात राहतील; वाचा

​गुरु वशिष्ठ-श्रीराम

वैदिक काळापासून प्रसिद्ध असलेले वशिष्ठ ऋषी अयोध्येचे राजगुरु होते. राजा दशरथ आणि श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचेही गुरु होते. वेद, पुराणातील सर्वोत्तम ज्ञान देऊन वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम, प्रचंड पराक्रमी बनवले. श्रीरामांसह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही अतूल्य मार्गदर्शन केले. गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत. गुरु वशिष्ठांनी श्रीरामांना वेळोवेळी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. वशिष्ठ ऋषींना सप्त ऋषिंमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

​महर्षी व्यास-शुक, वैशंपायन

परंपरागत उल्लेखांनुसार अनेक ग्रंथांचे कर्ते म्हणून व्यास प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेदांचे विभाजन व वर्गीकरण केले म्हणून त्यांना ‘वेदव्यास’ म्हणतात. याशिवाय व्यासशिक्षा, ब्रह्मसूत्रे, महाभारत, पुराणे, व्यासभाष्य आदी ग्रंथांचे कर्ते तेच समजले जातात. व्यासांच्या नावावर वेदव्यासस्मृती नावाचा एक स्मृतिग्रंथही आहे. महर्षी व्यासांचा जन्म आषाढी पौर्णिमेला झाल्याची मान्यता आहे. महाभारतातील उल्लेखावरून स्वत: व्यासांनी २४,००० श्लोकांचे उपाख्यानविरहित भारत रचिले व त्यांचा शिष्य वैशंपायन याने त्यात आख्यानोपाख्यानादिकांची भर घालून त्याला सुमारे एक लाख श्लोकसंख्या असलेल्या सध्याच्या महाभारताचे रूप दिले, असे आढळून येते. व्यासांनी त्यांच्या चार शिष्यांपैकी प्रथम शुकाला महाभारत शिकविले, असे सांगितले जाते.

​भगवान परशुराम-भीष्म, द्रोणाचार्य

विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार आणि सात चिरंजीवांपैकी एक मानले जाणारे परशुराम. महादेव शिवशंकरांनी त्यांना शस्त्रास्त्रविद्या शिकविली व परशू दिला. परशुराम धनुर्विद्येत विशेष निष्णात होते. परशुरामांनी भीष्म पितामह, द्रोणाचार्य, धनुर्विद्या शिकविली. नंतर द्रोणाचार्यांनी ती पुढे कर्ण आणि अर्जुन यांना शिकविली, असेही महाभारतात म्हटले आहे. याशिवाय कर्णाने स्वतः परशुरामांची सेवा करत अनेक विद्या शिकून घेतल्या, असाही उल्लेख आढळतो. परशुराम सप्तचिरंजिवांपैकी एक मानले गेल्याने रामायण, महाभारत आणि निरनिराळ्या काळातील घटनांशी त्यांचा संबंध जोडलेला आढळतो.

​गुरु द्रोणाचार्य-कौरव, पांडव

कौरव–पांडवांचे धनुर्विद्येतील गुरु व भारतीय युद्धातील कौरवांचे एक सेनापती म्हणून द्रोणाचार्यांचा उल्लेख आढळतो. सर्व कौरव पांडव राजपुत्रांना धनुर्विद्यादिकांत त्यांनी निष्णात केले. भीम व दुर्योधन यांना गदायुद्ध व मुष्टियुद्ध, अर्जुनाला धनुर्विद्या, युधिष्टिराला रथयुद्ध व नकुलसहदेवांना क्षेत्ररक्षण शिकविले. एकलव्य या शबरीपुत्रास त्यांनी विद्या शिकविली नाही, तरी त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून विद्या संपादन केली व तो त्या विद्येत अर्जुनापेक्षाही पारंगत झाला.

​Shukra Rashi Parivartan 2023: शुक्र ग्रहाचे संक्रमण; ‘या’ ५ राशींवर पडेल पैश्यांचा पाऊस, करिअरमध्येही प्रगती​

​सांदीपनी ऋषी-श्रीकृष्ण, बलराम

श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचे गुरु म्हणजे सांदीपनी ऋषी. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी गुरुकूल पद्धतीनुसार सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केल्याचे सांगितले जाते. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णांना चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकवल्या. वेद-पुराण यांच्यासह धर्मातील अनेक गोष्टींची भरपूर माहिती दिली, असे सांगितले जाते. संदीपनी म्हणजे देवांचे ऋषी, असा त्याचा अर्थ सांगितला जातो. उज्जैन येथे सांदीपनी ऋषींचा आश्रम आजही अस्तित्वात आहे.

​महर्षी विश्वामित्र-श्रीराम, लक्ष्मण

एक सूक्तकर्ते ऋषी, राजपुरोहित, मुळात क्षत्रिय राजे असूनही कठोर तपःश्चर्येच्या सामर्थ्यावर ‘ब्रह्मर्षी’ ही पदवी प्राप्त करणारे, ऋग्वेदातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या गायत्री मंत्राचे कर्ते, वसिष्ठांचे शत्रू अशा अनेक नात्यांनी ‘विश्वामित्र’ हे नाव वैदिक साहित्यात तसेच पुराणे, महाकाव्ये अशा उत्तरकालीन साहित्यात आलेले आढळते. वसिष्ठ-विश्वामित्र वादाचे दर्शन घडविणारी आणखी एक कथा वाल्मीकिरामायणात आलेली आहे. विश्वामित्रांनी श्रीराम व लक्ष्मणाला धनुर्विद्या आणि अनेक शस्त्रास्त्रविद्या दिली. श्रीराम आणि सीता यांच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला.

​July 2023: जुलै महिन्यातील सण-उत्सवाची यादी; गुरुपौर्णिमा ते कमला एकादशी, जाणून घ्या तारीख आणि महत्व​

​आर्य चाणक्य-चंद्रगुप्त

आर्य चाणक्य यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनीही ओळखले जाते. आर्य चाणक्यांनी रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस ‘चाणक्यनीती’ वा ‘दंडनीती’ म्हणून ओळखतात. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्यांचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. आपल्या मुसद्देगिरीच्या जोरावर आर्य चाणक्य यांनी अखंड भारताचे निर्माण केल्याचे मानले जाते.

Source link

great guru and shishyaguru and shishyaguru purnima 2023गुरु शिष्यगुरुपौर्णिमागुरुपौर्णिमा 2023
Comments (0)
Add Comment