हायलाइट्स:
- नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचं थैमान
- अनेक गावं पाण्याखाली
- पीक हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
नांदेड : नांदेड (Nanded)जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापुर परिसरात रात्री ढगफुटीसदृश्य (Heavy Rain)पाऊस झाला आहे. या पावसामुळे इस्लापुर परिसरात सर्वत्रच पाणी साचल्याचे चित्र आहे. या भागातील परोटी, रिठा आणि नांदगाव गावाच्या शिवारात पावसाचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे अनेक पीक हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. (Weather news Clouds of rain in Nanded many villages under water)
मुसळधार पावसामुळे परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यातून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या भागातील नागरिक मानवी साखळी करत पुराच्या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. तसेच किनवट नांदेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम आता सुरू असून या मार्गावर उभारण्यात आलेले पर्यायी पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे नांदेड किनवट मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
खरंतर, महापुरानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. हवामान खात्याकडूनही राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम राज्यभर होणार असून कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतकंच नाहीतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विकेंडनंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. (Weather news Clouds of rain in Nanded many villages under water)