आज, सोमवार ३ जुलै २०२३ ला दुसऱ्या कॅप फेरीची गुणवत्ता याची जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत प्रवेश न मिळालेल्या किंवा पहिल्या यादीत ना पसंतीचे कॉलेज मिळाल्यामुळे प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना आज कॉलेज मिळणार का याची प्रतीक्षा आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर, मुंबईमधील १ हजार चौदा कॉलेजांमध्ये मिळून सुमारे ६३ हजार विद्यार्थ्यांनी या फेरीत प्रवेश निश्चित केले होते. पहिल्या यादीत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ लाख १५ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा वाटप करण्यात आले होते.
(वाचा : Diploma Admission Updates : इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज)
त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश मिळालेली विद्यार्थी संख्या खूपच मर्यादित आहे. त्यामुळे आजच्या गुणवत्ता यादीत तरी आवडीचे कॉलेज मिळेल की नाही,या प्रतीक्षेत अनेक विद्यार्थी आहेत.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार, कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांच्या कट ऑफने उच्चांक गाठला होता. त्यामुळे, या दुसऱ्या गुणवत्ता यादीत तरी हा कट ऑफ खाली येईल, अशी आशा विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त होतेय.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार :
- कला शाखेसाठी एकूण ३२ हजार ७२३ जागांपैकी १३ हजार ७०६ जागांचे वितरण करण्यात आले आहे.
- वाणिज्य शाखेतील एकूण १ लाख २३ हजार ६०८ जागांपैकी ७२ हजार ४४७ जागा वितरीत
- ७६ हजार ९५१ जागांपैकी ४९ हजार ४९५ जागांचे विज्ञान शाखांतर्गत जागावाटप
- तर, एकूण ३ हजार ३०९ जागांपैकी ५८१ जागांचे एचएसव्हीसी शाखेसाठी जागा वितरण
असे असेल कॅप फेरीचे वेळापत्रक :
– दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज, ३ जुलै २०२३ ला जाहीर केली जाईल.
-विद्यार्थ्यांना ३ ते ५ जुलैदरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येईल.
– प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती कॉलेजांना ५ जुलै, रात्री ८ वाजेपर्यंत संकेतस्थळावर नोंदवावी लागेल.
-त्यानंतर शिक्षण विभागाकडून तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)
कोटा प्रवेशाची आज तिसरी गुणवत्ता यादी :
अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि भाषिक कोट्यांतर्गत राखीव जागांवरील प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादीही आज जाहीर केली जाणार आहे. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी २५ हजार ५९८ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी १२ हजार ८५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी आजच्या यादीत किती विद्यार्थ्यंना प्रवेश मिळणार हे आजच्या गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर कळेल.