हायलाइट्स:
- २२ वर्षीय तरुणाकडे आढळले जिवंत खवले मांजर
- जिवंत खवल्या मांजरासह एका तरुणाला अटक
- ‘या’ कामासाठी होतो वापर
गडचिरोली : वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ जिवंत खवल्या मांजरासह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सिरोंचा वन विभागातील अंतर्गत येत असलेल्या आसरअली वनपरिक्षेत्रातील चेतलपली येथे १७ ऑगस्ट रोजी धाड टाकून करण्यात आली आहे. तसेच जिवंत खवले मांजर ताब्यात घेण्यात आले असून दिवाकर लसमया गावडे (२२) याला अटक करण्यात आली आहे.
चेतलपल्ली येथील एका इसमाच्या घरी खवले मांजर असल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली होती. याची माहिती वनविभागाला मिळताच १७ ऑगस्ट रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या पथकाने त्या इसमाच्या घरी धाड टाकून खवले मांजर जप्त केले. सोबतच दिवाकर लसमया गावडे याला ताब्यात घेऊन सदर इसमावर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार व सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) सुहास बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील क्षेत्र सहाय्यक श्रीकांत नवघरे, भूपेश तागडे, सचिन शेडमाके, मोरेश्वर कोल्हे, राजू निब्रड, प्रीती पोटावी, सुनिता वेलादी आदींनी केली आहे.
वन्यजीवांच्या तस्करीमध्ये एकेकाळी वाघ तसेच हत्ती या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात लक्ष केले जायचे. त्यासंदर्भातील योजनाबद्ध कारवाईनंतर आता खवले मांजर कासवांच्या वेगवेगळ्या प्रजाती तसेच शार्क यांची तस्करीसाठी मोठ्या प्रमाणावर हत्या होत असल्याचे आढळून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होण्याऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचं प्रमाण अधिक असल्याचं WWF या संस्थेनेही म्हटलंय.
चीन आणि व्हिएतनाममध्ये याला खूप मागणी आहे. मांस खाण्यासाठी तर खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. खवले मांजर नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी या प्राण्याच्या व्यापाराचे मार्ग बंद करणं, तसंच अवैध मार्गाने होणारी तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची घोषणा WWF आणि TRAFFIC या संस्थांनी २०१६ साली केली हे विशेष.