अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगरातील (एमएमआर) विविध कॉलेजांमध्ये एकूण ३ लाख ८१ हजार जागा उपलब्ध आहेत. यातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून पहिल्या यादीत ६३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता.
पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर, मुंबईमधील १ हजार १४ कॉलेजांमध्ये मिळून सुमारे ६३ हजार विद्यार्थ्यांनी या फेरीत प्रवेश निश्चित केले होते. पहिल्या यादीत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ लाख १५ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा वाटप त्यावेळी करण्यात आले होते.
दुसऱ्या यादीत जागा वाटपासाठी १ लाख ७६ हजार जागा उपलब्ध आहेत. दुसऱ्या यादीतील या जागांसाठी अर्ज केलेल्या १ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ७५ हजार विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ८६ विद्यार्थी अजूनही प्रवेशाविना असल्याचे चित्र आहे.
पहिल्या यादीत अनेक विद्यार्थ्यांनी पसंतीचे कॉलेज न मिळाल्यामुळे प्रवेश घेतला नव्हता. पहिल्या यादीत १ लाख २२ हजार विद्यार्थ्यांना कॉलेजांमधील जागांचे वाटप करण्यात आले होते. त्यातील फक्त ६३ हजार विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला होता.
प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश मिळालेली विद्यार्थी संख्या खूपच मर्यादित असल्यामुळे, दुसऱ्या गुणवत्ता यादीत तरी आवडीचे कॉलेज मिळेल की नाही,या प्रतीक्षेत अनेक विद्यार्थी होते.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार, कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांच्या कट ऑफने उच्चांक गाठला होता. त्यामुळे, या दुसऱ्या गुणवत्ता यादीत तरी हा कट ऑफ खाली येईल, अशी आशा विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केली जात होती.
मात्र, अकरावी प्रवेशाची चुरस दुसऱ्या यादीतही कायम राहिली. मुंबईतील नामांकित कॉलेजांचा कट ऑफ एक टक्क्यानेही खाली न आल्यामुळे प्रवेशासाठीची रस्सीखेच पाहायला मिळते आहे. त्यामुळे निदान दुसऱ्या यादीत तरी आपल्याला आवडीचे कॉलेज मिळेल या आशेवर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.