आयआयटी-गुवाहाटीने (IIT-Guwahati) JEE स्कोअरशिवाय B.Tech अभ्यासक्रमासाठी प्रवेश द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे, तुम्हाला बी.टेक करण्यास स्वारस्य असेल आणि पात्रतेच्या काही अटींची पूर्तता तुम्ही करू शकलात तर, तुम्हाला आयआयटीमधून बी-टेक करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
आयआयटी गुवाहाटीच्या अधिकृत वेबसाईटवर याविषयीची संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे. याच अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अर्जही करू शकता.
आयआयटी गुवाहाटीने डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे. हे ४ वर्ष कालावधीचे बॅचलर डिग्रीचे अभ्यासक्रम आहेत.
बारावी गणिताव्यतिरिक्त कोणत्याही शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थी iitg.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जुलै २०२३ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे नवीन अभ्यासक्रम ‘मल्टीपल एक्झिट सिस्टमवर (Multiple Exit System) आधारित आहे. म्हणजेच एक वर्ष अभ्यास करून विद्यार्थ्याने अभ्यासक्रम सोडल्यास त्याला प्रमाणपत्र दिले जाईल. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम दोन वर्षांनी आणि ३ वर्षांनी सोडल्यानंतर साधारण बीएस्सी पदवी दिली जाईल. तर ४ वर्षानंतर बाहेर पडल्यावर बी-टेक पदवी मिळणार आहे.
या अभ्यासक्रमासाठी जेईई स्कोअरशिवाय प्रवेश दिला जाणार असला तरी, JEE Advanced परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास या अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.