आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच भविष्य उज्ज्वल असते, त्यांना चांगला पगार मिळतो. संशोधनाच्या क्षेत्रातही इथले विद्यार्थी आणि शिक्षक मोलाचे योगदान करत, महत्त्वाची भूमिका बजावतात.
आजवर आयआयटीचे सर्व कॅम्पस फक्त भारतातच होते, परंतु आता आयआयटीच्या पहिल्या ग्लोबल कॅम्पसची स्थापना पूर्व आफ्रिका देशातील टांझानियामध्ये होणार आहे. या संदर्भात, टांझानिया सरकार आणि भारताच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतेच एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
(वाचा : Engineering Degree: या संस्थांमध्ये मिळेल जेईईच्या मार्कांविना इंजिनिअरिंग आणि संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश)
परराष्ट्र मंत्रालयाने शेअर केलेल्या माहितीनुसार, आयआयटी टांझानिया कॅम्पस साधारणपणे यावर्षाच्या ऑक्टोबरमध्ये सुरु होणे अपेक्षा आहे. पहिल्या बॅचमध्ये ५० अंडर ग्रॅज्युएट (पदवी) आणि २० मास्टर्स (पद्युत्तर) अभ्यासक्रमांकरता विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. भारतीय विद्यार्थीही या कॅम्पसमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतील.
भारतीय शिक्षण मंत्रालय, आयआयटी मद्रास (IIT Madras) आणि टांझानियाचे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण झांझिबार मंत्रालय यांच्यात काही दिवसांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
या संदर्भात माहिती देताना, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी एक ट्विट करत, झांझिबारचे राष्ट्रपती डॉ. हुसैन अली म्विनी हे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
सोबतच, भारताचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही हा करार भारत आणि पूर्व आफ्रिका या दोन देशांमधील एकोपा आणि एकमेकांप्रती असणाऱ्या भावनांचे सकारात्मक प्रतिक असल्याचे सांगत झांझिबारच्या राष्ट्रपतींचे आभार मानत, या कराराबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
(वाचा : Best Engineering Colleges: ही आहेत महाराष्ट्रातील बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस; आयआयटी-मुंबईसह मुंबईच्या या कॉलेजांचाही समावेश)