तर ९ जुलै रोजी रविवारी या सिनेमाने एक मोठा रेकॉर्ड केला. यादिवशी ‘बाईपण भारी देवा’ने ६.१० कोटींची कमाई केली. हे बॉक्स ऑफिस कलेक्शन एका दिवसात एखाद्या मराठी सिनेमाने केलेले सर्वाधिक कलेक्शन आहे. आतापर्यंत कोणत्याच मराठी सिनेमाने एका दिवसात एवढी कमाई केली नव्हती. दरम्यान यानिमित्त केदार यांनी पोस्ट शेअर करत मायबाप रसिकांचे आभार मानले.
केदार यांनी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं की, ‘रसिकहो, आपण हा विक्रम सुध्दा आपल्या नावे केलात! मनापासून अभिनंदन. तुम्ही ठरवाल तेच होणार. पण एक सांगू? याचा अभिमान नक्कीच आहे. तरीही येणाऱ्या कुठल्याही नव्या मराठी सिनेमाने हा विक्रम लवकरात लवकर मोडावा हीच स्वामी चरणी प्रार्थना. यानेच मराठी सिनेमा झंझावात निर्माण करेल.’ केदार यांच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी कमेंट करत ‘बाईपण भारी देवा’च्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बाईपण भारी देवाचे कलेक्शन
बॉलिवूड बिझनेस अनालिस्ट तरण आदर्श यांनीही बाईपण भारी देवाच्या यशानिमित्त एक ट्विटर पोस्ट केली आहे. हा सिनेमा नव्याने रेकॉर्ड लिहित आहे, अशा शब्दात त्यांनी मराठी सिनेमाचे कौतुक केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी सिनेमाने २.३१ कोटींची कमाई केली. शनिवारी ५.२८ कोटी, रविवारी ६.१० कोटी आणि सोमवारी २.७९ कोटींची कमाई केली. या सिनेमाने सोमवारी १० जुलैपर्यंत २८.९८ कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ने याआधीही एक विक्रम केला होता. ओपनिंग वीकेंडला या सिनेमाने ६.४५ कोटी कमावले. पहिल्याच वीकेंडला एवढी कमाई करणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.