हायलाइट्स:
- डॉ. वैशाली झनकर यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज.
- डिस्चार्जनंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी.
- जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता.
नाशिक: प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आणि पुन्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आठ लाख रुपयांच्या लाचखोरीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस डॉ. झनकर कारागृहातच असतील, हे निश्चित झाले आहे.
( Vaishali Zankar Veer Bribe Case Updates )
वाचा:भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड पालिकेत ACBचा छापा; भर बैठकीतच…
शाळेला मंजूर असलेल्या वीस टक्के अनुदानानुसार शिक्षकांचे सुधारित वेतन काढण्याची परवानगी देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. या प्रकरणी झनकर पोलिसांच्या ताब्यात असताना मंगळवारी (दि. १७) त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावेळी जामिनासाठी खटाटोप करूनही तो नामंजूर करण्यात आला. त्यानंतर छातीत दुखत असल्याचे कारण पुढे करीत त्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. बुधवारी सकाळी त्यांचे नातेवाइक रुग्णालयात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात झनकरांची देखभाल नातेवाइक करीत होते. दुपारी अचानक त्रास होत असल्याचे सांगितल्याने त्यांना तपासणीसाठी संदर्भ रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी रुग्णवाहिकेत त्या ‘व्हिलचेअर’वर असल्याचे दिसले. मात्र, रुग्णवाहिकेतून उतरल्यावर त्या ठणठणीत चालत असल्याचे दिसले. तसेच रुग्णालयात तपासणीअंती त्यांची प्रकृती स्थिर असल्याची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार झनकरांना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुसरीकडे बुधवारी पुन्हा न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. परंतु, झनकरांचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याचे समजले. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी कायम ठेवली. त्यामुळे सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर झनकरांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
वाचा:महाराष्ट्रात तालिबानी राजवट आहे का?; ‘त्या’ नोटीसवर भाजपचाही सवाल
शिक्षक, वाहनचालकाला जामीन
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीतील प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले या दोघांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. प्रत्येकी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने कारागृहात त्यांची सुटका झाली आहे. त्या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. गुरुवारी शासकीय सुटी असल्याने झनकरांच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
निलंबनासाठी दुसऱ्यांदा प्रस्ताव
वैशाली झनकर यांना शुक्रवारी (दि. १३) पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षण आयुक्तांना त्यांच्यावर शिस्तभंग आणि निलंबनाच्या कारवाईसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, त्यानंतर शनिवार-रविवार, पतेती अशा तीन दिवस शासकीय सुट्या होत्या. त्यामुळे मंगळवारी किंवा बुधवारी झनकरांचे निलंबन होणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण आयुक्तांच्या दालनातून निलंबनाबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून झनकरांच्या शिस्तभंग व निलंबनासाठी दुसऱ्यांदा प्रस्ताव सादर झाला आहे. त्यामध्ये झनकर पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस पोलिसांच्या ताब्यात आहेत, असा उल्लेख आहे. यासह पोलिसांनी केलेल्या कारवाईसह न्यायालयातील हालचालींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे झनकरांच्या निलंबनाचे आदेश केव्हा निघतात याकडे लक्ष ठेवलेल्या शिक्षण वर्तुळात शिक्षण आयुक्तांची दिरंगाई का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाचा:पेट्रोल दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करा!; सीतारामन यांना दिल्या ‘या’ शुभेच्छा