सेंट लुईस विद्यापीठाच्या शिष्टमंडळाचे प्रोव्होस्ट डॉ. एरीक ऍम्ब्रेख्त यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठात यासंदर्भातील एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यापीठाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चाही करण्यात आली.
मुंबई विद्यापीठ आणि सेंट ल्युईस विद्यापीठ यांच्यामधील या महत्त्वपूर्ण बैठकीला डॉ. एरीक ऍम्ब्रेख्त यांच्यासोबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह सेंट लुईस विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे उपाध्यक्ष लूशेन ली, सल्लागार सुंदर कुमारसामी व जागतिक उपक्रम विभागाच्या संचालिका अनुशिका जैन उपस्थित होत्या.
(वाचा : लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला गती; वास्तू विशारद संस्थाकडून आराखड्याचे सादरीकरण)
कौशल्य प्रशिक्षणासह विविध विषयांवर सहकार्याची क्षेत्रे ठरविण्यासाठी झालेल्या या बैठकीत दोन्ही विद्यापीठात सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, कौशल्य प्रशिक्षण, ऑनलाईन इंटर्नशिप, सेंट लुईस विद्यापीठात प्रत्यक्ष इंटर्नशिप, विद्यार्थी-शिक्षक आदान-प्रदान अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
अनुभवात्मक प्रशिक्षण, भारतीय विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण आणि शिक्षकांच्या सक्षमीकरणाबाबत सेंट लुईस विद्यापीठ सदैव प्रयत्नशील असल्याचे डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त यांनी सांगितले. तसेच या विद्यापीठाचे शैक्षणिक कॅम्पस अमेरिकेतील मिसौरी व स्पेनमधील माद्रिद येथे असून भारतातून शिक्षकांना प्रशिक्षणासाठी तेथे पाठविले जाईल किंवा तेथील शिक्षकांना भारतात प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले जाईल असेही डॉ. ऍम्ब्रेख्त यांनी यावेळी सांगितले.
मुंबई विद्यापीठातील अविष्कार आणि अन्वेषण संशोधन महोत्सवातून समोर आलेल्या प्रतिभावंताना मदत तसेच अर्थसहाय्य करण्यासही सेंट लुईस विद्यापीठ उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. तर मानव्य विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रम आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रात अध्ययन आणि संशोधनास मोठी संधी असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
कौशल्याधारित शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठ आग्रही असून या क्षेत्रातील विविध संधीचे नवीन दालन यानिमित्ताने खुले होऊ शकणार असल्याचा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
(वाचा : MU Idol Exams: विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नवा नमुना; परीक्षा केंद्राला पूर्वकल्पना न देता परीक्षेचे आयोजन)