हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी सिनेमांचं बजेट फारच कमी असतं. बाईपण भारी देवा ,सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर फक्त पाच कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं तुलनेत अनेक पटीनं जास्त कमाई केली आहे.
केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल १२.५० कोटींची कमाई केली होती. इतकंच नाही तर प्रदर्शनाच्या दुसऱ्याच रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. तर दुसऱ्या आठवड्यापर्यंत सिनेमानं ३७.३५ कोटींची कमाई केली होती. आता तिसऱ्या आठवड्यातला कमाईचा आकडा समोर आला आहे.
रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची मोठ्या पडद्यावर इतकी जादू इतकी चालली आहे की, या सिनेमानं तब्बल ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘सॅकनिल्क’नं दिलेल्या आकड्यांनुसार रविवारी या सिनेमानं ५ कोटींची कमाई केली आहे. तर आत्तापर्यंतची कमाई ही ५४ कोटी झाली आहे.
सैराटचा रेकॉर्ड मोडणार का?
नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल ८५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर अद्यापही कोणत्या मराठी सिनेमाला हा रेकॉर्ड मोडता आला नाहीये. काही महिन्यांपूर्वी आलेल्या वेड सिनेमा ७५ कोटींची कमाई केली होती.त्यामुळं बाईपण बारी देवा हा सिनेमा सैराटचा रेकॉर्ड मोडणार का? याबद्दल प्रेक्षकांममध्ये उत्सुकता आहे.
आगामी काळात ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट इतर प्रादेशिक भाषांत डब केला जाण्याची शक्यता आहे.