‘स्टार्ट-अप’चा विचार करताय?; मुंबई महापालिका मिळवून देणार संधी

हायलाइट्स:

  • स्टार्ट-अपकडून मागवल्या संकल्पना
  • पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधांना प्राधान्य
  • स्वच्छता, कचरासफाई, आरोग्य, शिक्षणात सुधारणांचा उद्देश

नवउद्योजकांना मिळवून देणार संधी

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : नवउद्योजकांना उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर, आता मुंबई महापालिकादेखील ‘स्टार्ट-अप’ना बळ देणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता, कचरासफाई, आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी स्टार्ट-अपकडून संकल्पना मागवण्यात आल्या आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी ‘स्टार्ट-अप’ सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. ‘स्टार्ट-अप’ना ब‌ळ देणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका आहे.

देशातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्ट-अप योजना सुरू केली आहे. विविध राज्यातील शहरांमध्ये या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी ‘सोसायटी फॉर मुंबई इन्क्युबेशन लॅब टू आंत्रप्रीन्योरशीप कौन्सिल’ म्हणजेच ‘स्माईल’ हा उपक्रम पालिकेने सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी स्वच्छता, शहरी आरोग्य, शहरी शिक्षण या नागरी सुविधांसाठी संबंधित क्षेत्रातील नवउद्योजकांकडून संकल्पना अर्ज मागवले आहेत.

मुंबई महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून या पायाभूत सुविधा देत असून भविष्याचा विचार करता, यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काय करता येईल, नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन या सुविधा अधिकाधिक उपयुक्त कशा करता येतील, या स्वरूपाच्या संकल्पना पालिकेला अपेक्षित आहेत, अशी माहिती ‘स्माईल कौन्सिल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शशीबाला यांनी दिली. निवड झालेल्या संकल्पना कौन्सिलच्या कोअर कमिटीपुढे ठेवून त्यांची छाननी करण्यात येऊन स्टार्ट-अपची निवड करण्यात येईल. या कमिटीत पालिकेचे अधिकारी, आयआयटीचे तज्ज्ञ, उद्योजक, व्यावसायिक तसेच संबंधित विषयातील अभ्यासकांचा समावेश असेल, ही मंडळी व्यवसायवाढीसाठी स्टार्ट-अपना मार्गदर्शन करतील, असे शशीबाला यांनी स्पष्ट केले आहे.

बाजारपेठ, कार्यालयांसाठी जागा

स्टार्टअपसाठी निवड झाल्यानंतर उत्पादन, कल्पना संवर्धन याची चाचणी करून प्राथमिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे. या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, समुपदेशन, प्रोटोटाइप चाचणी केली जाणार आहे. स्टार्ट-अपना अंधेरी पूर्व येथे कार्यालयासाठी जागा तसेच आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. स्टार्ट-अपना केंद्र व राज्य सरकारतर्फे मिळणारे कर्ज आणि अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्टार्टअपसाठी इच्छुक असलेल्यांनी आपले अर्ज chief.bdd@mcgm.gov.in या ईमेलवर पाठवावेत.

– ईमेल विषयामध्ये उत्पादन किंवा सेवेचा उल्लेख करावा.

– अर्जदाराची माहिती असलेली (केवायसी) कागदपत्रे आवश्यक.

– संक्षिप्त स्वरूपात व्यवसायाची योजना मांडावी. (तीन पानांपेक्षा जास्त नसावी)

– २० ऑगस्ट ते पाच सप्टेंबर २०२१ पर्यंतच अर्ज पाठवायचे आहेत.

– व्यक्तिशः कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच मुदतीनंतर अर्जाचा विचार केला जाणार नाहीत.

– आपल्या संकल्पना व स्टार्ट-अप निवडीची माहिती ईमेल किंवा दूरध्वनीवरून कळवली जाईल.

Source link

BMCbmc startupStartup IdeasStartup Indiaमुंबई महानगरपालिका
Comments (0)
Add Comment