मुंबई विद्यापीठाच्या १६७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून पोर्टलचे अनावरण

Mumbai University E-Samarth Portal: मुंबई विद्यापीठाच्या १६७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून विद्यापीठात ई-गव्हर्नन्स प्रणाली राबविण्यासाठी विद्यापीठाने एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली म्हणून ई-समर्थ पोर्टल प्रणाली आजपासून कार्यान्वित केली आहे. या ई-समर्थ प्रणालीच्या पहिल्या टप्प्यात विद्यापीठ विभाग आणि संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आणि विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचे व्यवस्थापन या दोन प्रारुपांना सुरुवात करण्यात येत आहे.

मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी या पोर्टलचे अनावरण चित्रपट अभिनेते सुबोध भावे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषांने अ‍ॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील ४० विविध अभ्यासक्रम, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत विविध ४ अभ्यासक्रम, मानव्यविज्ञान विद्याशाखेतील विविध ३६ अभ्यासक्रम आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमातील विविध १८ अभ्यासक्रमांचा समावेश या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रणालीत करण्यात आला आहे. ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे.

(वाचा : अमेरिकेतील सेंट ल्युईस विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य सहकार्याचा करार)

उच्च शिक्षण क्षेत्रात एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली राबविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या मदतीने ही प्रणाली राबविण्यात येणार आहे. आजपर्यत दिल्ली विद्यापीठासह ४० हून अधिक उच्च शिक्षण संस्थामध्ये ही प्रणाली वापरली जात आहे. उच्च शिक्षण संस्थासाठी समर्थ ई-गव्हर्नन्स प्रणालीचे विविध ४० हून अधिक प्रारूप आहेत. मुंबई विद्यापीठामार्फत टप्प्या-टप्प्याने या प्रणालीत अनुषंगिक प्रारूप वापरले जाणार आहेत.

१६७ व्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी दीक्षान्त सभागृहात मुंबई विद्यापीठाचा १६७ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. स्थापना दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ सेवेत नाविन्यपूर्ण, कौशल्यपूर्ण आणि आदर्शवत काम केलेल्या गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रक्तदान शिबिराचे आयोजन

विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष (पदव्युत्तर विभाग) आणि टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या सयुंक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ३५ युनिट रक्त या शिबिरात जमा करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे (पदव्युत्तर विभाग) कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वंभर जाधव यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्ञान निर्मितीस पूरक

ज्ञान मिळविण्याची लालसा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवडीचे विषय शिकण्याची मूभा देणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अनेकांगी महत्वाचे असल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल व्यापक जनजागृती करून हे धोरण विद्यार्थ्यांपर्यंत योग्य पद्दतीने पोहचेल यासाठी विद्यापीठांची भूमिका अधोरेखित होणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांनी केले.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि कला क्षेत्र’ या विषयावर स्थापना दिनाच्या निमित्ताने वर्धापन दिन व्याख्यान मालेचे नववे पुष्प त्यांनी गुंफले. देशासह राज्यात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडून येणार असून शिक्षण हे फक्त पदवीपुरतेच मर्यादीत राहणार नसून तर या शिक्षणातून नवी ज्ञाननिर्मिती होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्व विशद करून या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या पदव्यूत्तर विभागाचे आणि स्वायत्त महाविद्यालयात पदवीच्या अभ्यासक्रमांची रचना ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने केली असून येणाऱ्या काळात या अभ्यासक्रमांचे महत्व अधोरेखित होणार असल्याचा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

(वाचा : MU Idol Exams: विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नवा नमुना; परीक्षा केंद्राला पूर्वकल्पना न देता परीक्षेचे आयोजन)

Source link

e-samarth portalmarathi celebritymumbai universitymumbai university e-samarth portalMumbai University Online New Portalmumbai university vconline admissionpost graduation admissionsubodh bhaveuniversity of mumbai
Comments (0)
Add Comment