आज मुंबई विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांच्या एकूण नऊ परीक्षा होत्या. बुधवार, १९ जुलै २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या सकाळच्या सत्रामध्ये आठ व दुपारच्या सत्रामध्ये एक अशा एकूण नऊ परीक्षा सुरू होत्या. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असल्याने रायगड जिल्हाधिकाऱ्यानी दिनांक १९ जुलै २०२३ रोजी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या या सुट्टीमुळे जे विद्यार्थी अतिवृष्टीमुळे किंवा सुट्टी असल्याने परीक्षा देऊ शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दि. २२ जुलै २०२३ रोजी त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.
शिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी बुधवारी म्हणजेच दिनांक १९ जुलै २०२३ रोजी परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार नाही.
आज झालेल्या नऊ परीक्षा :-
१. द्वितीय वर्ष बी.फार्मसी सत्र ३
२. एमएससी (फायनान्स) सत्र २
३. एमएससी सत्र १
४. तृतीय वर्ष बीए (७५:२५)सत्र ५
५. तृतीय वर्ष बीए सत्र ५
६. एमए (७५:२५)सत्र २
७. एमए सीजे (७५:२५)सत्र २
८. एमए पीआर (७५:२५)सत्र २
९. एमएससी आयटी व सीएस (६०:४०) व एमएससी गणित (८०:२०) सत्र ४
मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर :
० मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले असून नद्या ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतला असून शाळांना सुट्ट्या दिल्याचे जाहीर केले आहे.
संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांचे आदेश
० मुंबई, ठाणे पालघर, रायगडमध्ये उद्या शाळांना सुट्टी दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. तर, इतर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांची सूचना दिल्या आहेत.
० महाविद्यालयांच्या सुट्ट्यांबाबतीत अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही.