मुंबई विद्यापीठाच्या १६७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून विद्यापीठात ई-गव्हर्नन्स प्रणाली राबविण्यासाठी विद्यापीठाने एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली म्हणून ई-समर्थ पोर्टल प्रणाली १८ जुलैपासून कार्यान्वित केली आहे. या ई-समर्थ प्रणालीच्या पहिल्या टप्प्यात विद्यापीठ विभाग आणि संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आणि विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचे व्यवस्थापन या दोन प्रारुपांना सुरुवात करण्यात येत आहे.
मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी या पोर्टलचे अनावरण चित्रपट अभिनेते सुबोध भावे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांच्या हस्ते करण्यात आले.
(वाचा : Career In Sports Management: खुले आहे करिअरचे विस्तीर्ण मैदान; स्पोर्ट्स मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरच्या संधी)
विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील तब्बल ४२ अभ्यासक्रम, ह्युमॅनिटी शाखेतील ५२ अभ्याक्रम तर वाणिज्य शाखेतील ५ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया असणारा आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडिओ लिंक देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
- ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेशअर्ज सादर करणे- २१ जुलै ते ०५ ऑगस्ट २०२३
- विभागामार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी – २२ जुलै ते ०८ ऑगस्ट २०२३
- तात्पुरती गुणवत्ता यादी- १० ऑगस्ट २०२३ ( संध्याकाळी ६ वाजता)
- विद्यार्थी तक्रार – ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३
- अंतिम गुणवत्ता यादी – १४ ऑगस्ट २०२३ ( संध्याकाळी ६ वाजता)
- ऑनलाईन पेमेंट फी – १४ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२३
वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग दिनांक २१ ऑगस्ट २०२३ पासून सुरु करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.
(वाचा : UPSC Recruitment 2023: यूपीएससीच्या विविध पदांसाठी ७१ जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस)