हायलाइट्स:
- अनलॉकनंतर अवयव प्रत्यारोपण चळवळीलाही गती
- नागपुरात ब्रेन डेड व्यक्तीने केले अवयवदान
- मृत्यूच्या दारात असलेल्या चौघांना जीवदान
नागपूर:कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसलेल्या नागपूर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर मंगळवारी सरासरी १ अंशाच्या खाली घसरला. त्यामुळं पूर्वपदावर येत असलेल्या नागपूर जिल्ह्याला आणखी एक दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेली जिल्ह्यातील अवयव प्रत्यारोपणची चळवळही पुन्हा एकदा अनलॉक झाली आहे.
शहरात बुधवारी झालेल्या ऑर्गन रिट्रायव्हल मोहिमेमुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या चार जणांना जीवनदान मिळाले. या मोहिमेतून उपलब्ध झालेले हृदय मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयाकडे, यकृत मेडिट्रिना रुग्णालयात तर दोन मूत्रपिंडांपैकी एक सावंगी मेघे (वर्धा) तर दुसरे न्यू इरा रुग्णालयाकडे ग्रीन कॉरिडॉरमार्फत अवघ्या काही मिनिटांत पोहोचले आणि तिथं या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
वाचा: राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली?; हायकोर्टाचा सवाल
ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यूच्या दारात पोहोचलेले नागपूरकर दिनेश सोनावणे (वय ५०) यांनी अखेरच्या क्षणी अवयवदानाची तयारी दर्शवली. सोनावणे यांच्या कुटुंबीयांनी त्यास तात्काळ सहमती दिली. त्यामुळं अवयव निकामी झाल्यानं मृत्यूच्या दारात पोचलेल्या चौघांना जीवनदान मिळाले आहे. करोनाच्या निर्बंधांमधून बाहेर पडताच शहरात झालेले हे पहिले ऑर्गन रिट्रायव्हल अभियान यशस्वी झाले आहे.
वर्षातले पाचवे महा अवयवदान
करोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर शहरात झालेले हे पाचवे महा अवयवदान आहे. यापूर्वी ५ जानेवारीला नरेश मेश्राम यांच्या अवयवदानामुळे २ किडनी, यकृत आणि दोन नेत्रगोल उपलब्ध झाले होते. त्यानंतर २७ जानेवारीला रमेश खारवाडे यांनी केलेल्या अवयवदानामुळे २ किडनी, यकृत तर २० फेब्रुवारीला घनश्याम मेहता यांच्या अवयवदानातून यकृत आणि २ नोत्रगोल उपलब्ध झाले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ही चळवळ खंडित झाली होती. ती आता पुन्हा सुरू झाली आहे.
वाचा:रामभक्त हनुमानाच्या साक्षीनं दोन नेत्यांची भेट, टीकेचा भडिमार