मांजरीसारखं मला आडवं येऊ नका; नारायण राणेंचा कडक इशारा

हायलाइट्स:

  • नारायण राणे यांनी केलं बाळासाहेबांना अभिवादन
  • विरोधाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला इशारा
  • भावनेचा विचार करून बोला; राणेंनी सुनावलं

मुंबई: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. राणेंना स्मृती स्थळी येऊ न देण्याची भाषा शिवसेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी केली होती. त्या नेत्यांना खडे बोल सुनावतानाच राणे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अप्रत्यक्षपणे टोला हाणला. (Narayan Rane Warns Shiv Sena)

वाचा: LIVE ‘मुंबई भाजपच जिंकणार; ३२ वर्षांच्या पापाचा घडा फुटणार’

बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर नारायण राणे यांना पत्रकारांनी गराडा घातला. बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेबद्दल राणे काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती. राणे यांनी यावेळी बाळासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वावर घणाघात केला. राणे हे बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या काही नेत्यांनी विरोधाची भाषा केली होती. राणेंना शिवाजी पार्कमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला होता. त्यामुळं काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. मात्र, प्रत्यक्षात विरोधासाठी कुणीही पुढं आलं नाही. ही संधी साधत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या अन्य नेत्यांना टोला हाणला.

वाचा:बाळासाहेबांना अभिवादन करताना नारायण राणे भावूक, म्हणाले…

‘एखाद्या व्यक्तीची, महापुरुषांची किंवा दैवतांची स्मारकं असतील तर तिथं कुणीही विरोधाची भाषा करू नये. भावनेचा विचार करावा आणि त्या अनुषंगानं बोलावं, असं राणे म्हणाले. ‘कुणाला काही वाटत असेल तर त्यानं स्वत: बोलावं. उगाच डाव्या उजव्यांना पुढं करून फायदा नाही,’ असं टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता हाणला. ‘जशास तसं उत्तर देण्यासाठी मी प्रख्यात आहे. माझी तशी ख्याती आहे. त्यामुळं कुणीही माझ्या वाटेत मांजरीसारखं आड येऊ नये,’ असा इशाराही राणे यांनी दिला.

आम्हाला उपदेशाची गरज नाही!

जन आशीर्वाद यात्रेमुळं करोना आमंत्रण मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राजकीय पक्षांनी गर्दी टाळावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. याबद्दल विचारलं असता राणे म्हणाले, ‘आम्ही राजकीय काही करत नाही. आम्ही फक्त लोकांना भेटतोय. मुख्यमंत्री स्वत: सुद्धा जनतेच्या आशीर्वादानंच सत्तेत बसलेत. तेही आडमार्गानं. निवडून आलेले नाहीत. त्यामुळं आम्हाला कोणी उपदेश देण्याची गरज नाही. सगळे नियम, कायदे पाळूनच आम्ही सर्व करतोय.’

मुंबई महापालिका जिंकणारच!

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक भाजपच जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा यावेळी फुटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘मुंबई महापालिका जिंकणं हीच माझी जबाबदारी आहे. फडणवीस, दरेकर अशा सगळ्यांवरच ही जबाबदारी आहे. जबाबदारीचं अद्याप काही ठरलेलं नाही. पण मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच,’ असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Source link

Jan Ashirwad YatraNarayan Rane at Shivaji ParkNarayan Rane latest Comment on Shiv Senanarayan rane news todayNarayan Rane Warns Shiv Senaजन आशीर्वाद यात्रानारायण राणेनारायण राणेंचा शिवसेनेला इशारा
Comments (0)
Add Comment