पण त्या पलीकडे कला शाखेमध्ये करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहे. अगदी चित्रकला (Painting), मूर्तिकला (Sculpture), छायाचित्रण (Photography), चित्रपट निर्मिती (Film Making) पासून ते अभिनय(Acting) , दिग्दर्शन(Direction) , गायन (Singing), नृत्य (Dance) अशा अनेक कलांचे शास्त्रोक्त शिक्षण आज दिले जात आहे, आणि त्यात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध आहेत. अशीच एक करियरची संधी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. ज्या बद्दल अनेकांना ठाऊक नसेल. ती संधी म्हणजे आपल्याच ‘महाराष्ट्राची लोककला’.
महाराष्ट्राची लोकलला आणि करियर यांचा काय संबंध असे तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज ठरेल. कारण लावणी, पोवाडा, भारूड, तमाशा, गोंधळ , दशावतार अशा आजवर दुर्लक्षित राहिलेल्या महाराष्ट्रातील लोककलाच आज वरदान ठरणार आहेत. कारण याच लोककलेच्या माध्यमातून तरुण मुलांना करियरची एक नवी संधी मिळत आहे. .
मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) लोककला अकादमीत एक खास अभ्यासक्रम चालवला जातो, तो म्हणजे ‘महाराष्ट्रातील लोककला’ या विषयावर ‘पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम’. (Diploma In Folk Art of Maharashtra) या अभ्यासक्रमात वादन, नृत्य, लेखन, नाट्य , सादरीकरण याचे प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांसोबतच महाराष्ट्रातल्या विविध भागातून अस्सल लोककलावंत येतात आणि प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना लोककलेचे धडे देतात.
यामध्ये प्रामुख्याने जागरण-गोंधळ, लावणी , तमाशा , भारूड , दशावतार, पोवाडा या पाच लोककला शिकवल्या जातात. या कलांची पार्श्वभूमी, त्यातील समज गैरसमज, तात्विक मांडणी आणि सादरीकरण याचे सर्वांगीण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. वादन प्रकारात ढोलकी, दिमडी, संबळ, पखवाज आदी तालवाद्ये इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवली जातात तर नृत्यामध्ये मुरळी नृत्य, गोंधळ्यांची करपल्लवी, लावणीनृत्य, मुजरानृत्य, दशावतारी नृत्य आदी नृत्य प्रकार आणि गायनामध्ये एकूणच लोककलेतील गायकी, गायन पद्धती शिकवली जाते.
गायक आणि लोककलावंत प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे या विभागाचे प्रमुख आहेत. तर ज्येष्ठ ढोलकी वादक विजय चव्हाण, कृष्णा मुसळे या विभागात वादन शिकवतात. या खेरीज सुभाष खरोटे, हेमाली शेडगे, मदन दुबे, योगेश चिकटगावकर, मोनिका ठक्कर असे लोककलेचा दांडगा अभ्यास असलेले प्रशिक्षक इथे आहेत. तर अस्सल लोककला पाहता यावी, शिकता यावी यासाठी ग्रामीण भागातले लोककला वंत आणि मार्गदर्शकही इथे नित्याने येतात आणि विद्यार्थ्यांनाही तिथे अभ्यास दौऱ्यासाठी नेले जाते.
या अभ्यासक्रमामध्ये २५० मार्काची लेखी परीक्षा आणि २५० मार्काची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येते. आणि एका वर्षांमध्ये विद्यार्थी जे कला प्रकार शिकले त्यावर आधारित एक वार्षिक संमेलनही घेण्यात येते. या अभ्यासक्रमानंतर इथे शिकलेले विद्यार्थी ‘पेट’ परीक्षा देऊन पीएचडी देखील करू शकतात. तसेच गायन, वाद, नृत्य अशा एखाद्या कलेत प्राविण्य मिळवून त्याचे प्रशिक्षक होऊ शकतात. याशिवाय आपली स्वतःची शैली विकसित करुन लोककलेच्या सादरीकरणातून अर्थार्जन करू शकतात.
त्यात महाराष्ट्राची लोककला अगदी जागतिक स्तरावर पोहोचली आहे त्यामुळे सादरीकरणाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. शिवाय महाराष्ट्राच्या लोककलेचा सखोल अभ्यास करून एखादा विशिष्ट विषयाचे अभ्यासक म्हणून हे विद्यार्थी करियर करू शकतात. त्यामुळे ज्यांना आपल्या लोककलेची आवड आहे , ज्यांच्या अंगी हुन्नर आहे अशांसाठी हा अभ्यासक्रम नक्कीच मोठी पर्वणी आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुला बाहेरील सांस्कृतिक भवनात ‘लोककला अकादमी’ हा विभाग आहे. सध्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला असून दुसरी फेरी लवकरच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी विभागाच्या संशोधन समन्वयकांशी यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. अंतरिक्ष खरात – संशोधन समन्वयक – ८३६९९४९६६५/९७०२०९५४६७