घरातून ऐकलेला महाराजांचा प्रताप गोष्टीच्या रूपाने आपल्या समोर येतो ते चौथीच्या पाठ्य पुस्तकातून आणि महाराजांच्या पराक्रमाचे धडे गिरवत आपण इतिहास हा विषय शिकायला सुरुवात करतो. महाराजांनी या मराठी मातीसाठी दिलेलं योगदान ते स्वराज्य मिळवून त्याचं सुराज्य करण्याचा ध्यास हा आपल्या प्रत्येकालाच प्रेरणा देऊन जातो. पण तो शिकण्यासाठी चौथीच इयत्ता का? किंवा चौथीच्याच पुस्तकात महाराजांचा इतिहास घेण्याचा विचार कुठून आणि का आला असेल ते आज पाहूया..
जर आपण महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासल्या शिवाय आपली कुणाचीही इयत्ता चौथी पुढे सरकलेली नाही. अगदी कित्येक पिढ्या इयत्ता चौथीमध्ये हा इतिहास शिकत आहेत. शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते त्यांनी स्वराज्य मिळवे पर्यंतचे अनेक महत्वाचे प्रसंग, लढाया या पुस्तकातून आपण अभ्यासल्या आहेत . एक पुस्तक वाचलं की महाराजांचे संपूर्ण चरित्रच आपल्याला कळून जायचे.
हा अभ्यासक्रम लागू होऊन कित्येक पिढ्या पुढे गेल्या, काळ झपाट्याने बदलला अगदी सगळ्या विषयांची पुस्तकं बदलली. पण चौथीचं इतिहासाचं पुस्तक आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हे समीकरण कधीच बदललं नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण तब्बल १९७० साली इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. तेव्हापासून या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांना अढळस्थान आहे. त्यामुळे काळानुसार त्यात थोडेफार बदल केले जातात पण पुस्तकाचा मूळ गाभा अजूनही तसाच आहे.
कारण, १९९१ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता, सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्याचवेळी या सगळ्याचे पडसाद विधिमंडळात उमटले आणि मोठा ठराव त्यावेळी मंजूर करण्यात आला. तो ठराव म्हणजे, ‘चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास कधीच पुसला जाणार नाही’.
किंबहुना चौथीच्या विद्यार्थ्यांचे वय असे असते ज्या काळात मुलांचा मेंदू झपाट्याने विकसित होत असतो, एखादी गोष्ट ग्रहण करण्यासाठी ते सक्षम झालेले असतात. किंबहुना अशा काळात झालेले संस्कार, मिळालेले ज्ञान हे कायमचे लक्षात राहत असते, त्यामुळे या योग्य वयात मुलांना महाराजांचा इतिहास शिकवला जातो. म्हणूनच आपण कितीही मोठे झालो तरी चौथीच्या पुस्तकातून शिकलेला इतिहास आपल्या आजही लख्ख लक्षात आहे. फोटो सौजन्य : pubhtml5.com