एस. एम सारसकर दवाखान्यात सुरू होता भयंकर प्रकार, छापा टाकताच पोलिसही हादरले

वाशिम : लिंग परीक्षण करून अवैध गर्भपात करण्यासाठी शासनाचे कठोर कायदे असतांनाही वाशीम शहरात एका रुग्णालयात अवैध गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. आरोग्य विभागाच्या पथकाने व शहर पोलिसांनी छापा टाकून संयुक्त कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. यात एक बोगस डॉक्टर असून दवाखान्यातून गर्भपातासाठी लागणारा औषधीसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ ऊडाली आहे.

वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एस. एम सारसकर दवाखान्यात काल संध्याकाळी ७:१५ वाजताच्या दरम्यान छापा मारण्यात आला. या दवाखान्यात अवैध गर्भपात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री नबंरवर मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग व पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता, या दवाखान्याची झडती घेतली. त्यात गर्भपात करण्याचा औषधीचा साठा आणि अन्य साहित्य मिळून आले. सदर साहित्य जप्त करून आरोपी डॉ. सारसकरसह विलास ठाकरे या बोगस डॉक्टरलाही अटक करून वाशिम शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एकीकडे शासन ‘बेटी बचाव बेटी पढाव’ सारख्या योजना राबवत आहे. गर्भ लिंग चाचणीला परवानगी नसतांना २४ आठवड्याचा गर्भपात या रुग्णालयात सुरु होता. महिलेला त्या डॉक्टरने गर्भपाताचे औषध देण्यात आले होते. दरम्यान आरोग्य पथक व पोलिसांनी छापा टाकून या गर्भपात केंद्राचा भांडाफोड केला. हा मुलींच्या जीवावर उठलेला गोरखधंदा मागील किती दिवसापासून सुरु होता हे तपासाअंती समोर येणार आहे.

याच्या विरुद्ध विविध कलमा अन्वये वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून सध्या त्या महिलेची प्रकृति बरी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिक्तिसक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

यात दोन आरोपींना अटक झाली असली तरी आरोग्य विभागाने अजून यात सहभागी असलेल्या सोनोग्राफी सेंटरची तपासणी करून त्याला अटक करणे गरजेचे आहे. नाही तर काही पैश्याच्या लोभापायी गर्भ लिंग चाचणी करून कोवळ्या कळ्यांच गळा घोटण्याच काम चालूच राहील.

Source link

Comments (0)
Add Comment