हायलाइट्स:
- पोलीस आयुक्तालयात घुसत आत्मदहन केलेल्या नागरिकाचा मृत्यू
- पोलिसांच्या भूमिकेबाबत उपस्थित केले जात आहे प्रश्नचिन्ह
- नातेवाईकांनी मृतेदह ताब्यात घेण्यास दिला नकार
पुणे : चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्यामुळे स्वतः ला पेटवून घेत थेट पोलीस आयुक्तालयात घुसत आत्मदहन केलेल्या नागरिकाचा गुरूवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ४२, रा. पाडळे वस्ती, औंध रस्ता खडकी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याचा मृतेदह ताब्यात घेण्यास नकार दिला.
पिंगळे यांनी एका खासगी कंपनीत नोकरीसाठी खडकी पोलिसांकडे चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला होता. पण, त्यांच्या नावावर तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखवल्यामुळे प्रमाणपत्र देण्यास विलंब होत होता. कोथरूड आणि समर्थ पोलीस ठाण्याचा अहवाल आला होता. गुन्हे दाखल असलेला सुरेश पिंगळे हे वेगवेगळे असल्याचे पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले होते. मात्र, सहकारनगर पोलीस ठाण्याचा अहवाल आला नव्हता.
बुधवारी सकाळी पिंगळे प्रमाणपत्राबाबत चौकशीसाठी गेले होते. पण, त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या समोर स्वतः ला पेटवून घेत प्रवेशद्वारातून आतमध्ये घुसले. पेटती व्यक्ती आयुक्तालयात येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली. आतमध्ये मंदिराजवळ त्यांना पोलिसांनी विझवून तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सुर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाण त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना गुरूवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मृत्यू झाला.
दरम्यान, पिंगळे यांच्या पत्नी व इतर नातेवाईकांनी न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर सुर्या हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.