म्हणून योग्य वेळी, योग्य वयात, योग्य करियर निवडणे खूप गरजेचे असते. कारण आपल्याला काय करायचं आहे आणि आपण काय करतो आहे यामध्ये घोळ झाला तर ते करियर आपल्याला एकवेळ पैसे मिळवून देऊ शकते पण कामाचे समाधान मात्र कधीही मिळत नाही. म्हणून करियर निवडताना खूप सावधपणे ते निवडावे जेणेकरून पुढे पश्चातापाची वेळ येत नाही.
म्हणूनच करियर कसे निवडावे यावर आज काही खास टिप्स पाहूया. या जर तुम्ही आजमावून पाहिल्या आणि मग करियरची निवड केली तर पुढे यश हे निश्चितच तुमचे असेल. अर्थात या टिप्सही आपल्याच हातात आहेत. त्यासाठी कुठेही जाण्याची किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही. तेव्हा पाहूया कोणत्या आहेत या सहा गोष्टी…
नेमके काय करायचे आहे :
करियर निवडण्यापुढे काही प्रश्न आपण स्वतःला विचारणे गरजेचे आहे. ते म्हणजे मी कोण आहे, माझी तत्व काय आहेत, मला काय करायला आवडते, मला काय येते, मला काय पेलू शकते, माझ्यात कोणती कौशल्ये आहेत.. या प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत. ती एकदा मिळाली की नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हा कल निश्चित होईल आणि करियर निवडणे सोपे जाईल.
(वाचा: Netflix Jobs: लाखात नाही कोटीत पगार.. नेटफ्लिक्सची ऑफर पाहून चक्रावून जाल.. या पदासाठी..)
आवड पहा:
बऱ्याचदा आपल्या पुढे खूप पर्याय असतात, खूप काही येत असते आणि खूप काही करावेसे वाटत असते. अशावेळी त्यातले सर्वात जास्त काय आवडते, कोणती आवड आपण काम म्हणून स्वीकारली तर आपण ती बराच काळ करू शकतो, किंवा त्याचा कंटाळा येणार नाही, हे पाहणे गरजेचे आहे. त्याची खात्री झाली की करियर निवडणे अधिक सोपे होईल.
आपलेच मूल्यमापन:
करियर निवडताना आपणच आपले मूल्यमापन करणे गरजेचे आहे. आपले शिक्षण काय, पात्रता काय, आपल्या अंगी कोणते गुण आहेत हे पारखने गरजेचे असते. त्यानंतर आपल्या पात्रते नुसार कोणते क्षेत्र आपल्याला करियर करण्यासाठी योग्य आहे याचाही विचार नक्की करावा. कारण घेतलेले क्षेत्र पुढे जाऊन यशस्वी रित्या पूर्ण करणे ही मोठी जबाबदारी असते.
पुढचा विचार महत्वाचा:
करियर निवडताना आपण आपली आवड लक्षात घेतल्यानंतर सगळयात महत्वाचा भाग म्हणजे आपण स्वतःला कुठे पाहतो. कारण करियर निवडायचे असेल तर आपल्यापुढे एक लक्ष्य असायला हवे की पुढच्या पाच ते दहा वर्षात मला कोणत्या विशिष्ट ठिकाणी पोहोचायचे आहे ते. मग ते कोणतेही पद असेल, उपाधी असेल किंवा आर्थिक वृद्धी असेल. त्याचा विचार करुनच करियर निवडावे जेणेकरून तिथे पोहोचणे सोपे होते.
आर्थिक गरज:
जगण्यासाठी लागतो तो पैसा आणि हल्लीच्या महागाईच्या जगात तर पैशाशिवाय काहीच शक्य नाही. त्यामुळे आपण जे क्षेत्र निवडतो आहोत त्यातून पैसे कसे मिळवायचे. त्यात जास्त पैसे मिळत नसतील तर त्याला पूरक आणि पोषक असे दुसरे कोणते क्षेत्र आहे, त्याचाही विचार करायला हवा. कारण समाधानासोबत आर्थिक गरजही आजच्या घडीला तितकीच महत्वाची आहे.
सारासार विचार:
या पाच गोष्टी अवलंबल्या तर आपल्याला करियरच्या नेमक्या वाटा समजतील. कदाचित करियर कोणते करायचे हे लगेच ठरणार नाही पण तसे खात्रीशीर पर्याय समोर येतील. एकदा ते मिळाले की मग त्यातल्या तज्ज्ञांकडून, मित्रांकडून, पालकांकडून मार्गदर्शन घ्यावे. त्यातले खाचखळगे, मर्यादा याचा सारासार विचार करावा आणि मग पुढे पाऊल टाकावे.
(वाचा: मातृभाषेला कमी लेखू नका, ‘मराठी’ भाषेतही आहेत करियरच्या ‘या’ खास संधी..)