लोकल प्रवासासाठी लसधारक प्रवाशांना एका प्रवासासाठी तिकीट न देता महिन्याचा पास काढण्याची सक्ती महापालिका आणि राज्य सरकारने केल्यामुळे प्रवासी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. १५ ऑगस्ट रोजी लोकल सर्वसामान्यांसाठी खुली होऊनही या अटीमुळे लोकलप्रवास करता येत नसल्याने प्रवासीही आक्रमक भूमिका मांडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि त्यांच्यासोबतचे नातेवाईक, तातडीच्या कामासाठी मुंबईत जाणारे नागरिक यांना एखाद-दुसऱ्या लोकल प्रवासासाठीही पास काढण्याचा नाहक भुर्दंड बसत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ही या लढ्यात उडी घेतली असून ‘पास देतात मग तिकीट का देत नाही?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
‘करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींना महिन्यातून दोन वेळाच प्रवास करायचा असेल, तर त्यांनी महिनाभराचा पास का काढावा? मोलमजूर, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, तातडीच्या कामांसाठी जाणारे नागरिक सरकारला दिसत नाहीत का? हे कसले नियोजन? पास देतात, तसेच तिकीट द्यायला काय हरकत आहे?,’ अशा शब्दांत आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी महापालिकेला थेट जाब विचारला आहे.
‘नायर, केइएम यांसारखे आधुनिक सरकारी रुग्णालय संपूर्ण महामुंबईत नाही. कर्करुग्ण आणि टीबीसारख्या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठीदेखील लोकल प्रवास महत्त्वाचा आहे. एकदा – दोनदा प्रवास करणाऱ्यांना एक महिन्याचा पास काढायला सांगणे म्हणजे प्रवास अधिकारावरच गदा आणण्याचा प्रकार आहे. करोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. असे नियम लादणे म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार आहे,’ या शब्दांत रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्या रेखा देढीया यांनी संताप व्यक्त केला आहे.
माझ्या ४० वर्षांच्या रेल्वे प्रवासात पहिल्यांदाच असे अजब निर्णय राज्य सरकारने लावल्याचे दिसते. तिकीट न देण्यामागे योग्य कारण असेल, तर मान्य करता येईल. मात्र प्रशासन कारणही सांगत नाही. रेल्वेला विचारले असता, महापालिकेच्या नियमांकडे बोट दाखवले जाते. मंत्रालयात रेल्वे प्रवाशांचे निवेदन घ्यायला कर्मचारी नाहीत. हे नेमके काय सुरू आहे?
– नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, प्रवासी एकता महासंघ
राज्य सरकारने मुंबई महापालिकेला महामुंबईतील लोकल प्रवासाची नियमावली आखण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. मुंबई महापालिकेने काढलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये लसधारकांना मासिक पास देण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. महापालिकेच्या सुचनेनुसार, रेल्वे स्थानकांवर लसधारकांना पास देण्यात येत आहेत.
– मध्य आणि पश्चिम रेल्वेची भूमिका
पाठवा तुमच्या प्रतिक्रिया
लसधारक प्रवाशांसाठी लोकलची दारे उघडताना, केवळ मासिक पास उपलब्ध करण्यावरून मतमतांतरे उमटत आहेत. एका प्रवासाचे तिकीट उपलब्ध न केल्यानेही अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया, मते matapratisad@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला कळवा. त्यातील निवडक पत्रांना प्रसिद्धी देण्यात येईल.
म. टा. भूमिका
तिकीट मिळायला हवे
करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींना अर्थात लसधारकांना लोकल प्रवासासाठी मासिक पाससह तिकीटही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महामुंबईतील अनेक नागरिक आरोग्याच्या सुविधेसाठी मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहेत. या रुग्णांना पास काढणे शक्य नसल्याने त्यांना तिकीट मिळायला हवे. न्यायनिवाड्यासाठी, कामानिमित्त, नातेवाईकांना भेटण्यासाठी तसेच अन्य कारणासाठी लोकलने प्रवास करणारा वर्ग मोठा आहे. त्यांना लोकल दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने पाससह तिकीट देण्याचाही निर्णय घ्यावा.