गुणवत्तेनुसार जाहीर झालेल्या महाविद्यालय प्रवेशाच्या याद्यांमधून अनेक विद्यार्थ्यांनी आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. लवकरच अकरावीचे वर्गही सुरु होतील. परंतु ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा क्रम चुकल्याने, कमी गुण मिळाल्याने किंवा अन्य काही कारणामुळे महाविद्यालयत प्रवेश मिळाला नाही अशांसाठी आता तिसरी विशेष फेरी घेण्यात येणार आहे.
(वाचा: Mumbai University: मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद आणि प्रदर्शन! चुकूनही चुकवू नये असा आहे विषय…)
इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ही तिसरी विशेष फेरी सुरू झाली असून विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत म्हणजे ८ ऑगस्ट पर्यंत नवीन नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३२६ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीला प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागातर्फे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या झाल्या आहेत.आता तिसरी एक विशेष फेरी होणार आहे.
या फेरीचे वेळापत्रक https://pune.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. या प्रवेश फेरींतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात बदल करण्यासाठी, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी आणि नवीन नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
या प्रवेश प्रक्रियेचे कामकाज ‘कॅप’ अंतर्गत बुधवार ९ ऑगस्ट पर्यंत चालेल. त्यानंतर या फेरीअंती महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जाहीर केली जाईल. या फेरीतून महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १० ते १२ ऑगस्टपर्यंत प्राप्त महाविद्यालयात प्रवेश घेणे गरजेचे आहे.
(वाचा: ZP Recruitment 2023: महाभरती! राज्यातील ३४ जिल्हा परिषदा आणि १९ हजार जागा.. असा करा अर्ज..)