कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने अशा कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यांत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या ६४८ विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कारवाई केली आहे. त्यात कोल्हापूर सह सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण आणि घरी बसून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याने कॉपी करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले. पुढेही विद्यार्थ्यांना तीच सवय लागली. त्यालाच आळा घालण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने यावर्षी हिवाळी सत्रातील परीक्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १८ परीक्षा केंद्रांवर भरारी आणि बैठे पथक तैनात केले. या पथकाने केलेल्या कारवाईत जवळपास ७७९ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.
त्या विद्यार्थ्यांची चौकशी परीक्षा प्रमाद समितीच्या अंतर्गत करण्यात आली. या चौकशीनंतर ६४८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तर उर्वरीत १३१ जणांच्या कॉपी प्रकरणावर कार्यवाही सुरू आहे. त्यांची चौकशी गुरूवारी परीक्षा प्रमाद समितीच्या बैठकीत होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १०, सांगली ३ आणि सातारा जिल्ह्यातील ५ परीक्षा केंद्रांचा समावेश होता. यापैकी भरारी पथकाने ५९४ तर बैठ्या पथकांना १८५ विद्यार्थी कॉपी करताना पकडले आहेत.
(वाचा – UPSC Success Story: ३५ परीक्षांचे अपयश पचवणारा विजय वर्धन अखेर ‘आयएएस’ झालाच! वाचावी अशी यशोगाथा..)
कॉपी बहाद्दरांना झालेली शिक्षा आणि विद्यार्थी संख्या
- कॉपी करताना सापडलेल्या ४३५ विद्यार्थ्यांचे त्या विषयात मिळालेले गुण रद्द करण्यात आले.
- तर ११३ विद्यार्थ्यांचे त्या विषयात मिळालेले गुण रद्द करून ५०० रुपये दंड आकारण्यात आला.
- एका विद्यार्थ्याचे त्या विषयात मिळालेले गुण रद्द करून त्याला १००० रुपये दंड आकारण्यात आला.
- तर ४७ विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षेत मिळालेले गुण रद्द करण्यात आले.
- १ विद्यार्थ्याचे संपूर्ण परीक्षेत मिळालेले गुण रद्द करून त्याला ५०० रूपये दंड आकारण्यात आला.
- १६ विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षेचे गुण रद्द करून त्याला पुढील एका परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात आला.
- १० विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षेत मिळालेले गुण रद्द करून त्यांना पुढील दोन परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात आला.
- २० विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षेत मिळालेले गुण रद्द करून त्यांना पुढील तीन परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात आला.
- ५ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
(वाचा- CAT 2023 Notification: ‘आयआयएम कॅट २०२३’ परीक्षेसाठी नोंदणी सुरु, अर्ज भरण्याची ‘ही’ तारीख शेवटची..)