कॉर्पोरेट जगातात कंत्राटी नोकऱ्यांवर भर असल्याने कसलीही खात्री नसते. म्हणजे पगार जरी जास्त असला तरी तुमची नोकरी कधीही जाऊ शकते, त्यावर कसलेही नियंत्रण नाही. म्हणूनच सरकारी नोकऱ्यांसाठी अनेकांचा हट्ट असतो. अगदी तिथे जागा कमी असल्या तरी लाखो लोक त्यासाठी अडून असतात. त्यातही सरकारी नोकरी म्हणजे परमनंट जागा, सरकारी सोयी, सर्व सुविधांचा लाभ अशी आपली धारणा असल्याने सरकारी नोकरीसाठी भारतात मोठी चुरस पाहायला मिळते.
असे असले तरी सरकारी नोकरीचे काही तोटेही आहेत. तुम्हीही सरकारी नोकरीच्या मागे धावत असाल तर एकदा ते तोटे वाचाच…
स्पर्धा आणि अनिश्चितता:
भारत हा प्रचंड लोकसंख्येचा देश असल्याने तितक्या सरकारी नोकऱ्या आपल्याकडे निर्माण होऊ शकत नाही. इथे सरकारी नोकऱ्यांची संख्या अत्यंत मोजकी आहे आणि त्यासाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवार नोकऱ्यांच्या जागांपेक्षा कैकपट जास्त आहेत. त्यामुळे भारतात सरकारी नोकऱ्यांसाठी प्रचंड गर्दी आहे, स्पर्धा प्रचंड आहे. परिणामी जर तुम्ही सरकारी नोकरीच्या मागे असाल तर तिथे वाढणाऱ्या गर्दीमुळे नोकरी मिळेलच याची कोणतीही खात्री नाही.
(वाचा: Career Change Tips: नोकरी सोडताय? मग आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर…)
वेळ आणि संधी दोन्हीही वाया:
सरकारी नोकरी मिळवणे आज खूप कठीण झाले आहे. कारण स्पर्धा मोठी असल्याने तुम्हाला कधी संधी मिळेल याची खात्री नाही. परिणामी कित्येक वर्ष त्या नोकरीची वाट पाहण्यात वाया जातात. सरकारी नोकरी परमनंट असली तरी ती मिळवण्यासाठीचा संघर्ष वाढाला आहे. त्यामुळे आपला वेळ आणि संधी दोन्ही हातातून निसटतात. कारण दरम्यान अनेक कॉर्पोरेट नोकऱ्यांचे पर्याय आपल्यापुढे असतात परंतु सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत त्याही संधी हातच्या निघून जातात.
निवड प्रक्रिया:
भारतामध्ये सरकारी नोकरीसाठीची निवड प्रक्रिया प्रचंड लांबलचक आहे. भरती जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या परीक्षा, लागणारे निकाल, मग मुलाखती, निवड फेरी, कागदपत्रांची पडताळणी यामध्ये बराच वेळ जातो. शिवाय ही प्रक्रिया तणावपूर्ण असते. त्यामुळे निवड प्रक्रिया पार पाडणे हे देखील उमेदवारांसाठी आव्हान असते.
चौकटीतले वातावरण:
सरकारी नोकरी मिळाली तरी आपल्याकडे वर्षानुवर्षे चौकटीत राहूनच काम केले जाते. ज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते खालच्या पदापर्यंत प्रत्येकाच्या कामाला विशिष्ट मर्यादा असतात. इथे हायरारकी पद्धत असल्याने नोकरीत अनेक आव्हाने येतात. तुमच्या मनात कामाविषयी अनेक अद्ययावत कल्पना असल्या तरी तुम्हाला वरिष्ठ वर्गापुढे फारसा वाव मिळत नाही. विशेष म्हणजे ज्यांना प्रगती करायची असते, नवनवीन प्रयोग करायचे असतात त्यांना अशा वातावरणाचा त्रास होतो.
प्रगती धीम्या गतीने:
सरकारी नोकरी मिळाली तरी तिथे प्रगती ही अत्यंत संथगतीने होत असते. कारण कॉर्पोरेट प्रमाणे मोठाली पगारवाढ, कंपनी बदलली की पुन्हा मोठाल्या ऑफर असे पर्याय इथे नसतात. इथे शासनाच्या वेतन श्रेणीनुसारच तुम्हाला पगारवाढ मिळते. शिवाय पदोन्नतीबाबतही काही निकष असतात त्यामुळे प्रमोशनही लवकर मिळत नाही. कॉर्पोरेट प्रमाणे झपाट्याने तुमची प्रगती होऊ शकत नाही. जसे सरकारी नोकरीचे काही फायदे आहेत, तसेच हे तोटेही आहेत, ज्याकडे या धावत्या जगात दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे उमेदवाराने आपली गरज आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन सरकारी किंवा खासगी हा निर्णय घ्यायला हवा.
(वाचा: Competitive Exam Tips: स्पर्धा परीक्षा देताय? मग सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून करा ‘या’ गोष्टी..)