भारताचा विमान क्षेत्रात होणाऱ्या विस्ताराला अगदी गती मिळावी या पार्श्वभूमीवर नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) भरती मोहीम हाती घेतली आहे. ज्या अंतर्गत एकूण ६२ जागांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या पदांवर निवडल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांना मासिक २ लाख ८२ हजार किमान ते ९ लाख ३० हजार कमाल वेतन देण्यात येणार आहे.
‘डीजीसीए’ने जाहीर केल्यानुसार उपमुख्य विमान ऑपरेशन निरीक्षक, वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक, फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (विमान), फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (हेलिकॉप्टर) आदी पदांसाठी ही भरती असणार आहे. यापैकी, उपमुख्य विमान ऑपरेशन निरीक्षक या पदाकरिता महिन्याला नऊ लाखांचा पगार देण्याचे निश्चित केले आहे तर सर्वाधिक कमी पगार हा फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (हेलिकॉप्टर) या पदाकरिता आहे. या पदाकरिता महिन्याला २ लाख ८२ हजार इतका पगार देण्यात येणार आहे.
(वाचा: Competitive Exam Tips: स्पर्धा परीक्षा देताय? मग सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून करा ‘या’ गोष्टी..)
लवकरच या भरतीबाबत अधिसूचना जाहीर केली जाईल. साधारण २३ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीद्वारे इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, कामाचे ठिकाणे याचे तपशील लवकरच जाहीर केले जातील. विशेष म्हणजे हवाई क्षेत्रात महिलांना ५० टक्के जागा मिळावी म्हणून या भरती प्रक्रियेसाठी डीजीसीएने एक समिती देखील नेमली आहे. विमानसेवा क्षेत्रामध्ये पुरुष व महिलांचे प्रमाण समान राखण्याच्या उद्देशाने हे धोरण ठरवले असून तातडीने त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठीही शिफारस करण्यात आली आहे.
देशातील विमान सेवेमध्ये केबिन क्रू, ग्राउंड स्टाफ आणि काही प्रमाणात वैमानिक अशा ठराविक विभागातच महिलांचा समावेश आहे. पण त्या पलीकडे महिलांनी विमान सेवेतीळ विविध विभागांमध्ये सक्रिय व्हावे, यासाठी ‘डीजीसीए’चे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी ‘डीजीसीए’ने स्थापन केलेल्या समितीत ऑपरेशन विभागाच्या संचालक सुर्विता सक्सेना, प्रशिक्षण विभागाचे संचालक आर. पी. कश्यप, प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रवीण मालवीय, एअरक्राफ्ट इंजिनियरिंग संचालनालयाचे उपसंचालक कविता सिंग आदी मान्यवर मंडळींचा समावेश आहे. या समितीला सहा महिन्यांची वेळ देण्यात आली आहे, त्या ठराविक कालावधीत समितीने विमान सेवेत महिलांना सामान संधी कशी देता येईल यासाठीची रचना आणि अंमलबजावणी याची रूपरेषा सादर करणे गरजेचे आहे.
(वाचा: HAL Recruitment 2023: ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ मध्ये भरती! पगारही आहे भरपूर; आजच अर्ज करा..)