स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा देशभरातील सर्वच प्रेक्षकांना लागून राहिली होती. सिनेमाचं आगाऊ तिकीट बुकिंग सुरू होताच काही तासांमध्येच हजारो तिकिटांची विक्री झाली होती. २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. त्यामुळे आता सिनेमांच्या सिक्वेलमध्ये नेमकं काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. करोनापश्चात हिंदी बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांत ‘गदर २’चं नाव जोडलं गेलंय. ‘पठाण’नंतर ‘गदर २’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी अभिनित ‘ओएमजी २’ सिनेमानंही १० कोटींची कमाई केली. सिक्वेलच्या या जोडगोळीनं एकंदरीत ओपनिंगलाच अर्धशतकी कमाई करून दिली आहे.
दोन बड्या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असल्यानं उत्सुकता होती. पण, सिनेमागृहांत आमनेसामने येऊनही प्रेक्षकांनी दोन्ही चित्रपटांना दिलेला प्रतिसाद पाहता; बॉलिवूडकर सुखावले आहेत. २२ वर्षांपूर्वी, म्हणजे २००१ झाली जेव्हा ‘गदर’ प्रदर्शित झाला होता तेव्हा त्याबरोबर १५ जून २००१ रोजी ‘गदर’बरोबर आमीर खानचा बहुचर्चित ‘लगान’ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे दोन्ही सिनेमे हिट ठरले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’बाबत होताना दिसते आहे.
दाक्षिणात्य राज्यातही हिट
केवळ महाराष्ट्र आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये नव्हे, तर ‘गदर २’ सिनेमा हा दाक्षिणात्य राज्यांमध्येदेखील चांगली गर्दी खेचताना दिसतोय. सध्या दक्षिणेकडील राज्यांत रजनीकांत यांचा ‘जेलर’ सिनेमा धुमाकूळ घालत असताना; देशभक्तीची कहाणी सांगणाऱ्या ‘गदर २’ला देखील मोठा प्रेक्षकवर्ग मिळताना दिसतोय. केरळ, कर्नाटकमधील सिनेमागृह व्यवस्थापकांकडूनही या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.
सिनेसृष्टीला उभारी
सिनेमा व्यवसाय विश्लेषक कोमल नाहटा यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘प्रेक्षक ‘गदर २’ चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. अनेक प्रेक्षकांच्या भावना या सिनेमाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांमुळे पुन:पुन्हा प्रेक्षक हा सिनेमा पाहत आहेत. सिनेमातील नॉस्टेल्जीक बाजू सिनेमाला विशेष ठरवते. व्यावसायिक गणिताच्या अंदाजानुसार हा सिनेमा पहिल्या आठवड्यात २०० कोटींची कमाई करू शकतो. हिंदी सिनेमा व्यवसायात ही महत्वपूर्ण बाब आहे. यामुळे सिनेसृष्टीला उभारी मिळेल.’
ओएमजी २
सेन्सॉर आणि अनेक वादविवादांना सामोर गेल्यांनतर शेवटी ‘ओएमजी २’ प्रेक्षकांच्या भेटीस आला. सिनेमाची कथा आणि कलाकारांच्या कामाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होताना दिसतंय. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटातून एका महत्वपूर्ण विषयावर भाष्य केल्याच्या चर्चा होत आहेत.
सेक्स या विषयावर उघडपणे बोलताना आजही अनेकांची जीभ कचरते. याबद्दल दबक्या आवाजातच चर्चा होतात. म्हणूनच लैंगिक शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष होते. याविषयीच भाष्य करणारा ‘ओएमजी २’ हा सिनेमा प्रेक्षकांना विशेष भावला आहे. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्याचं समर्थन करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून पाठिंबा मिळताना दिसतोय. एकीकडे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला २७ कट आणि ‘ए’ प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे सध्या केवळ १८ वर्षांवरील प्रेक्षकच हा चित्रपट पाहू शकतात. परंतु, या सिनेमाचा विषय देशभरातील किशोरवयीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, असा सूरही प्रेक्षकांकडून उमटताना दिसतोय.
माऊथ पब्लिसिटीचा फायदा!
सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सिनेमावरून अनेक वाद झाले होते. पण, आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या सकारात्मक ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे अधिकधिक प्रेक्षक ‘ओएमजी२’कडे वळताना दिसतोय.
प्रेक्षक येणारच
सिनेमा व्यवसाय विश्लेषक गिरीश जोहर यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘मुळात कलाकृती चांगली असल्यावर ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि प्रेक्षक त्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देतात. ‘ओएमजी २’च्या बाबतीतदेखील तसंच झालं. प्रारंभी काही विवाद होऊनही आज बॉक्सऑफिसवर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद आहे. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ दोघांचा प्रेक्षकवर्ग आहे. काहींनी दोन्ही सिनेमे पाहिले, तर काहींनी त्यांच्या आवडीनुसार एक-एक सिनेमा पाहिला. प्रेक्षकांना चांगलं दिलं की प्रेक्षक येणारच.’