‘अर्थशास्त्र म्हणजे अर्थ + शास्त्र म्हणजेच पैशांशी निगडित शास्त्र होय.’असा अनेकांचा गैरसमज आहे. आर्थिक व्यवहारांशी निगडित हा विषय असला तरी शब्दानुसार तो पैशांशी निगडित म्हणावे इतका सोपाही नाही. अर्थशास्त्र म्हणेज विविध क्षेत्रातील वित्त आणि माहिती विषयाचा अत्यंत सूक्ष्म आणि सखोल अभ्यास घडवणारे शास्त्र होय. त्यामुळे ते शास्त्र आत्मसाद करणेही काहीसे कठीण असते पण अशक्य नक्कीच नाही. आणि जर तुम्ही त्यात तज्ज्ञ झालात तर मग करियरची चिंता करण्याचे काहीच करत नाही.
अर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती मोठी आहे. ज्याचे विभाजन सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, विकासाचे अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र, गणितीय अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र अशा उप आणि महत्वपूर्ण घटकात केले आहे. तुम्हाला ज्या घटक विषयात रस असेल त्यात तुम्ही पदवीच्या पुढचे, अगदी पीएचडी पर्यंत शिक्षण घेऊ शकता. आज अनेक महाविद्यालयांमध्ये हा विषय निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनही केले जाते. तेव्हा पाहूया भारतातील कोणत्या अशा नामांकित संस्था आहेत तिथे अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेता येईल.
(वाचा: NAAC Assessment: अभिमानास्पद! नॅक मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल .. गुजरातलाही टाकले मागे…)
अर्थशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या भारतातील काही खास संस्था
- टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई
- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली
- दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली
- मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, चैन्नई
- गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे
- मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मुंबई विद्यापीठ, मुंबई
- इंडियन इन्स्टिट्यूट, कोलकता
- इंदिरा गांधी डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट, गोरेगाव, मुंबई
- कृषी संशोधन व विकास संस्था, बंगळूर
- बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
याखेरीज अनेक विद्यापीठांमध्ये आणि खासगी संस्थांमध्ये अर्थशास्त्र विषयातील संशोधन आणि शिक्षणासाठी विशेष विभाग आहेत.
अर्थशास्त्र विषयातील रोजगाराच्या संधी…
- अर्थशास्त्र विषयाला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे, त्यामुळे या विषयातून पदवी आणि पुढचे शिक्षण झाल्यास स्पर्धा परीक्षा तुम्ही देऊ शकता.
- ज्या विद्यार्थ्यांचे अर्थशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झाले असेल त्यांना ‘आयएस’ म्हणजेच इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस मध्ये नोकरीची संधी मिळू शकते.
- अर्थशास्त्र विषयात पदवी आणि पुढे आवश्यक ते शिक्षण घेऊन शाळेत शिक्षक किंवा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होता येते.
- ‘अर्थशास्त्रा’मध्ये ‘सांख्यिकी’ (Statistics) हा विषय महत्त्वाचा आहे. या विषयात तुमची तज्ज्ञता मिळवती तर राज्याच्या जिल्हा आणि राज्य पातळीवर शासनाची अनेक सांख्यिकी कार्यालये आहेत. ज्यामध्ये ‘डेटा सायन्स’च्या (Data Science) मदतीने माहितीचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे या विभागांमध्येही मोठी संधी असते.
- अर्थशास्त्राचे पदवीधर बँकिंगच्या मोठ्या परीक्षा देऊन बँकेत अधिकारी पदावर रुजू होऊ शकतात. ‘आरबीआय’मध्ये यंगस्कॉलर परीक्षा देऊन उच्च पदावर सेवा करता येते. शिवाय ‘आरबीआय’सह अनेक बँकेत अधिकारी पदाच्या संधी उपलब्ध असतात.
- सरकारच्या वित्त विभागात या विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते, कारण करआकारणी, करवसुली त्याचे व्यवस्थापन यासाठी अर्थशास्त्र तज्ज्ञांची गरज असते.
- पदव्युत्तर शिक्षणानंतर या विद्यार्थ्याना विविध परीक्षांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, युनो अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरही संधी मिळू शकते.
- कृषी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली तर कृषी क्षेत्रातही संधी आहेत. कारण शेतीचे नियोजन, उत्पादन पद्धती, आधुनिक दृष्टिकोन, शेतीचीअर्थव्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अर्थशास्त्र तज्ज्ञांचीच गरज असते.
- अर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने त्यातला कोणताही एक सूक्ष्म घटक घेऊन तुम्ही संशोधन करू शकता. ज्यातून पुढे अनेक संधी आहेत. या शिवाय व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट क्षेत्रातही अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी आहेत.
(वाचा: Independence Day 2023: ‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ यातला नेमका फरक काय? ‘या’ गोष्टी कधीही विसरू नका )