विद्यापीठ मुख्य परिसर व उपपरिसरातील विविध अभ्यासक्रमांसाठी २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठीसाठी प्रदेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. मुख्य परिसरातील ४५ विभाग, धाराशिव येथील दहा विभागात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ४७१ कॉलेजांसाठी ही प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.
मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला याआधी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, या प्रक्रियेला गुरुवारी मुदतवाढ देण्याचा निर्णय विदयापीठ प्रशासनाने घेतला. इंजिनीअरिंग, मेडिकल अभ्यासक्रमांसह वेगवेगळ्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, प्रवेश प्रक्रिया लांबली तरी अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याच्या अटीवर ही मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
(वाचा : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे बिगुल वाजले; सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला होणार मतदान)
विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेतील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांचेही अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडण्याचीही शक्यता आहे. शिवाय, याकारणामुळे तासिकांचे वेळापत्रक आणि अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी कॉलेजांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सुरुवातीला ३१ जुलैपर्यत प्रवेशप्रक्रियेची मुदत वाढवण्यात आली होती. त्यानंतर, १० ऑगस्ट आणि आता २१ ऑगस्टपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे यावर्षीचे शिक्षणसिक सत्र लांबणीवर पडणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांमधील १३५ पेक्षा अधिक विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दीड लाखांपेक्षा अधिक जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
अनेक जागा प्रवेशांविना…
विद्यापीठ मुख्य परिसर, धाराशीव उपपरिसर पदव्युत्तर विभागांमधील अभ्यासक्रमाचे प्रवेश ५ जूनला सुरु करण्यात आले होते. इथल्या ४५ व उपपरिसरातील १० अशा तब्बल ५५ विभागांमधील ६५ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दोन हजार ४६९ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अजूनही इथे अनेक जागा रिक्त आहेत. चाळीस टक्क्यांहून अधिक जागांवर प्रवेश न झाल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे.