इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी; शासनाने जाहीर केला विद्यार्थी हिताचा निर्णय

Carry Option For Engineering Diploma: इंजिनिअरिंग डिप्लोमा (अभियांत्रिकी पदविका) अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र (semester) पूर्ण करण्यासाठी कॅरीऑनची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नियामक परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या २०२३ मधील उन्हाळी परीक्षांमधील प्रात्यक्षिक परीक्षा ७ ते १४ मे २०२३ दरम्यान तसेच लेखी परीक्षा १७ मे ते ०६ जून २०२३ दरम्यान घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल २९ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. हा निकाल जाहीर झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी तंत्रनिकेतनातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया विलंबाने झाल्यामुळे शैक्षणिक कालावधी कमी मिळाला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम झाला आणि अनेक विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषय राहीले होते. त्यामुळे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षापुरता ‘कॅरीऑन (Carry On) चा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(वाचा : Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणुकांना लाल कंदील; स्थगितमुळे विद्यार्थी संघटना संतप्त)

या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सन २०२३ च्या निकालानुसार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षा नियमावलीतील तरतुदीनुसार पुढील सत्र/वर्षाकरिता प्रवेशास अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये सदर सत्र पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी हितास्तव एक विशेष बाब म्हणून एक वेळ संधीचा निर्णय घेण्यात आला.

शिवाय, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील साधारणत: २२ हजार विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्याकरीता आणि ३६ हजार विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र कर्म पूर्ण करण्याकरीता संधी उपलब्ध होणार आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. याबाबत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडून परिपत्रक निर्गमीत करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी सदर परिपत्रकानुसार पुढील वर्षाचे सत्रकर्म करणेबाबतची योग्य ती कार्यवाही संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

Source link

Carry Onchandrakant patilDiploma Carry On OptionEngineering DiplomaEngineering Diploma Carry On Optionmsbtemsbte news
Comments (0)
Add Comment