करियर म्हणजे फक्त डॉक्टर, इंजिनियर आणि अन्य काही बोटावर मोजण्याइतकी क्षेत्रे, असेच आपल्या मनावर बिंबवले जाते. त्यातही कुणी पदवी अभ्यासक्रमाला इतिहास हा विषय निवडलाच तर तो एकतर आवड म्हणून किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणून निवडला जातो. नाहीतर तसा हा विषय दुर्लक्षितच . पण जर तुम्हाला इतिहास आवडत असले आणि संधीची चिंता असेल तर कसलीही भीती न बाळगता बिनधास्त इतिहासात पदवी आणि त्या पुढचे शिक्षण करा. कारण, या विषयाय अनेक खास संधी दडलेल्या आहेत.
इतिहास विषयात पदवीधर शिक्षण घेतल्यास करिअरच्या अनेक संधी खुल्या होतात पण प्रामुख्याने असे पाच पर्याय आहेत जे खूपच युनिक आणि तुमहाला वेगळी ओळख मिळवून देणारे आहेत. ते म्हणजे पुरातत्त्व संशोधनशास्त्र, मानववंशशास्त्र, दफ्तरपाल, संवर्धक, संग्रहालयशास्त्र. आता हे नेमके काय प्रकरण आहे ते विस्ताराने जाणून घेऊया..
पुरातत्त्व संशोधनशास्त्र (Archaeological science)
मानवाच्या जीवनशैलीचा, त्याच्या कल्पकतेचा आणि त्याच्या समाज रचनेचा आदिम पुरावा देणाऱ्या हडप्पा – मोहंजोदडो संस्कृतीचा शोध लागला तो पुरातत्त्व संशोधकांमुळेच. नामशेष झालेल्या आपल्या संस्कृतीचे उत्खनन करून, त्याद्वारे सापडलेले दस्ताऐवज, शिलालेख, नाणी, वस्तू, ताम्रपट, शिलालेख यांचा अभ्यास करून त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे काम हे संशोधक करत असतात. एखाद्या उत्खननात मिळालेल्या माहितीचे, वास्तूचे, वस्तूचे कार्बन डेटिंगद्वारे प्रयोगशाळेत संशोधन करून ते विश्लेषण करतात. हे काम खूप संथगतीने चालते शिवाय तितकेच आव्हानात्मक आहे. पुरातत्व विभागात आणि इतिहासावर संशोधन करणाऱ्या अनेक संस्थांमध्ये अशा संशोधकांना खास संधी असते.
(वाचा: Competitive Exam Tips: स्पर्धा परीक्षा देताय? मग सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून करा ‘या’ गोष्टी..)
मानववंशशास्त्र (Anthropology)
इतिहास विषयातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे मानववंशशास्त्र. माणसाच्या उगमापासून ते उत्क्रांती पर्यंतचा अभ्यास आणि संशोधन करण्याचे काम हे संशोधक करतात. हे असे शास्त्र आहे ज्यामध्ये इतिहास, भूगोल, पुराण, संशोधनशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र अशा विविध शास्त्रांचा समावेश आहे. आज मानववंशशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना सरकारी तसेच खासगी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधक, अभ्यासक, प्राध्यापन म्हणून मोठी संधी आहे.
दफ्तरपाल (Archivist)
दफ्तरपाल या शब्दापेक्षा अर्कायव्हिस्ट हा शब्द अनेकांना परिचित आहे. अर्कायव्हिस्ट या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे जतन करून ठेवणारा. जुन्या संदर्भाचे, पुस्तकांचे, वस्तूंचे, पुराव्यांचे जतन करणे, त्याची सूची तयार करणे, संशोधन करणाऱ्यांना त्याची योग्य माहिती पुरवणे, मार्गदर्शन करणे हे काम अर्कायव्हिस्ट करत असतात. सरकारी यंत्रणा, महामंडळं, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये, संशोधन संस्था अशा ठिकाणी या अर्कायव्हिस्टना साठी संधी असते. यांचे काम अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे असते.
संवर्धक (Conservator)
अर्कायव्हिस्ट आणि कॉन्झव्र्हेटर यांच्या कामात हलकीशी तफावत असते. अर्कायव्हिस्ट हे जतन करण्याचे काम करतात तर ते जतन करण्यासाठीची प्रक्रिया कॉन्झव्र्हेटर करत असतात. नामशेष होत चाललेल्या, झालेल्या, उत्खननात समोर आलेल्या संदर्भांचे वस्तूंचे, दस्ताऐवजांचे संवधर्न करण्याचे काम हे संवर्धक करत असतात. त्यासाठी एक विशिष्ट् शास्त्र ते शिकतात ज्यामध्ये सापडलेल्या वस्तूचे मूळ रूप न बदलता तिला जतन करण्याचे तंत्र शिकवले जाते. अनेक मोठ्या ग्रंथालयांमध्ये, वस्तूसंग्रहालयांमध्ये, शासकीय विभागात, इतिहास संशोधनात कॉन्झव्र्हेटरची गरज असते.
संग्रहालयशास्त्र (Museology)
संग्रहालयशास्त्र म्हणजे म्युझिओलॉजी. प्रत्येक संग्रहालयात म्युझिओलॉजी अभ्यासकांसाठी संधी असते. कारण तिथल्या प्रत्येक वस्तू, संदर्भ हे मौल्यवान असल्याने त्याचे व्यवस्थापन, जतन आणि संवर्धन या तिन्ही गोष्टींची जबाबदारी घेणारी व्यक्ती देखील तज्ज्ञ असणे गरजेचे असते. तेच काम म्युझिओलॉजिस्ट करतात. संग्रहालय कसे असावे, ते कसे दिसायला हवे तिथपासून ते त्याचे विपणन, प्रकाशन ही सगळी जबाबदारी म्युझिओलॉजिस्टची असते.
(वाचा: Top Acting Institute: अॅक्टर व्हायचंय? मग भारतातील ‘या’ टॉप इन्स्टिट्यूट विषयी नक्की जाणून घ्या..)