तसे या विषयाकडे फारसे कुणी वळत नाही, कारण त्याविषयी कुणाला नीटशी माहिती नाही. आपल्याकडे जे प्रचलित विषय आहेत त्यांचीच री ओढली जाते पण अशा वेगळ्या विषयांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण कमी पडलेले दिसतो. ‘मानववंशशास्त्र’ हा असाच विषय आहे, ज्याविषयी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण भविष्यात करिअरला नवी दिशा देणारा हा विषय आहे.
‘मानववंशशास्त्र'(Anthropology) ही इतिहास विषयाचीच एक शाखा आहे. मानवाच्या अस्तित्वापासून ते उत्क्रांतीपर्यंतचा शोध घेण्याचे काम हे शास्र करते. म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेची माहिती आपल्याला इतिहासातून मिळते पण ती घटना नेमकी का घडली, त्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि त्या घटनेतील अनेक सूक्ष्म संदर्भ शोधण्यासाठी साठी आपल्याला मानववंशशास्त्राचा आधार घ्यावा लागतो.
जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल, त्यात करियर करायचे असेल तर ‘मानववंशशस्त्र’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी प्रचंड सय्यम, अभ्यास आणि चिकित्सक प्रवृत्ती असणे गरजेचे आहे. कारण इतिहासातील माणसाचे अस्तित्व, त्याचे संदर्भ याच्या खोलपर्यंत जाऊन त्याचे संशोषण आणि विश्लेषण करणारे हे शास्त्र आहे. जुन्या कथा, ग्रंथ, दाखले, पुरान याचा आधार घेऊन तिथल्या संस्कृती, समाजरचना याचा शोध घेण्याचे, त्याविषयी ठोस माहिती पुरवण्याचे काम मानववंशशास्त्रज्ञ करतात. त्यामुळे ही एक महत्वाची विद्याशाखा आहे. थोडक्यात काय तर मानवाशी संबंधित सर्व घटनांचा अभ्यास मानववंशशास्त्रात (अॅन्थ्रोपॉलॉजी) मध्ये केला जातो.
(वाचा: Top Acting Institute: अॅक्टर व्हायचंय? मग भारतातील ‘या’ टॉप इन्स्टिट्यूट विषयी नक्की जाणून घ्या..)
मानववंशशास्त्रज्ञ काय करतात?
आजचा समाज असा का आहे याचा शोध घेण्यासाठी मानवाचा इतिहास जाणून घेणे, तेव्हाची संस्कृती समाजशास्त्रीयदृष्ट्या, भौतिकशास्त्रीयदृष्ट्या कशी असेल याचे संशोधन करणे, तसेच मानवाचा उगम, त्याची उत्क्रांती, भाषिक बदल, परंपरा, समाजरचना, धर्म, रूढी, प्रथा, अर्थशास्त्र, जीवनशास्त्र, कायदेपद्धती याबाबत सखोल आणि स्पष्ट माहिती मिळवण्याचे काम मानववंशशास्त्रज्ञ करत असतात. या व्यतिरिक्त त्या त्या क्षेत्रातील गरजेनुसार मानवाशी निगडित प्रश्नांचे संशोधन आणि विश्लेषण ते करतात.
अभ्यासक्रमाविषयी…
‘मानववंशशास्त्र’ हा विषय बारावी नंतर पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशा दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये आहे. भारतामध्ये काही महाविद्यालयांमध्ये बारावी नंतर पदवी अभ्यासक्रमात तो समाविष्ट आहे तर काही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. मानववंशशास्त्राच्या करियर म्हणून विचार केला तर त्याच्या विविध शाखा देखील आहे ज्यामध्ये विशिष्ट विषयाचे अधिक विस्ताराने संशोधन केले जाते. जसे की, सामाजिक- सांस्कृतिक मानववंशशास्त्र, जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र, पुरातत्त्व मानववंशशास्त्र, भाषिक मानववंशशास्त्र, उपयोजित मानववंशशास्त्र अशा शाखांचा समावेश आहे.
करिअरची संधी
मानववंशशास्त्रज्ञ हे इतिहासाशी निगडित संस्था, म्युझियम्स, आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, एनजीओ यामध्ये अभ्यासक आणि संशोधक म्हणून काम करू शकतात. याशिवाय महाविद्यालय व विद्यापीठात प्राध्यापक म्हणूनही संधी मिळते. तुम्ही जर पूर्णवेळ संशोधन करणार असाल तरीही या क्षेत्रात मोठी संधी आहे. सरकारी विभाग, पुरातत्व खाते, खासगी रिसर्च सेंटर, अॅन्थ्रॉपॉलॉजिकल रीसर्च संस्था, अॅन्थ्रॉपॉलिकल सव्र्हे ऑफ इंडिया, सार्वजनिक आरोग्य संस्था, नियोजन आयोग, महिला आयोग, अनुसूचित जाती व जमातीचे आयोग, विविध सरकारी विभाग आदीमध्ये अॅन्थ्रॉपॉलिजिस्ट पदासाठी विशेष जागा असतात. तसेच विविध गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मदत करण्यासाठी फोरेन्सिक तज्ज्ञ म्हणूनही बोलावले जाते. औद्योगिक विकास व स्थानिक समाज यांच्यातील तेढ कमी करण्यासाठीदेखील अॅन्थ्रॉपॉलॉजिस्टचे मार्गदर्शन घेतले जाते. क्रीडा क्षेत्रातही संशोधक आणि मार्गदर्शक म्हणून अॅन्थ्रॉपॉलिजिस्टला महत्व आहे.
(वाचा: Career Tips: येत्या ५ वर्षांत तुम्हाला काय करायचे आहे? करिअर प्लानिंगचा होईल खूप फायदा; टिप्स जाणून घ्या)