‘सीबीएसई’ने दहावी-बारावीच्या परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांचे सर्व तपशील शाळांकडून मागविली आहे. शाळांनीही यासंदर्भात प्रक्रिया सुरु केली आहे. या निर्णयाची सक्तीने अंमलबाजवणी होणार असल्याने बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरताना विद्यार्थी तो अचूकच भरतील आणि विषय अचूक नोंदवतील याची काळजी घेण्याच्या सूचना ‘सीबीएसई’ने शाळांना दिल्या आहेत.
हा निर्णय घेण्यामागे मागील परीक्षांचे काही अनुभव असल्याचे ‘सीबीएसई’ने म्हटले आहे. गेल्या काही वर्षात बोर्डाच्या परीक्षेत शाळा आणि विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरताना हलगर्जीपणा झाल्याचे सीबीएसईच्या निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सीबीएसई’ने अधिकृत परिपत्रक काढत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे शाळा आणि विद्यार्थ्यांना निर्देशित केले आहे.
(वाचा: Career Tips: येत्या ५ वर्षांत तुम्हाला काय करायचे आहे? करिअर प्लानिंगचा होईल खूप फायदा; टिप्स जाणून घ्या)
सीबीएसई विद्यार्थ्यांची सध्या २०२४च्या बोर्ड परीक्षेसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे शाळांनी याबाबत विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकांनाही याबाबत सूचना दिल्या आहेत. ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे की, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती नोंदविणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सर्व सूचना काटेकोरपणे माहीत असल्या पाहिजेत. तसेच पालकांनीही आपल्या पाल्याची अचूक माहिती भरली जाईल, याची खबरदारी घ्यावी. कारण एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा फॉर्म अचूक भरणे हे आता विद्यार्थ्यांसह शाळा आणि पालकांची देखील जबाबदारी झाली आहे. शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाकडे देण्यापूर्वी ती अचूक आणि योग्य असल्याची खात्री करावी, असे ‘सीबीएसई’ने स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
(वाचा: Top Acting Institute: अॅक्टर व्हायचंय? मग भारतातील ‘या’ टॉप इन्स्टिट्यूट विषयी नक्की जाणून घ्या..)