आपल्याला चित्रपटाचा झगमगाट दिसत असला तरी त्या कलेचे मूळ रूप नाटकात दडलेले आहे. एकादा तुम्ही नाट्य कलेत माहीर झालात की तुम्ही पडद्यावर अगदी सहज काम करू शकता. म्हणूनच आजही कित्येक दिग्गज कलाकार हे ‘नाटक’ करण्याचा आवर्जून सल्ला देतात. तसे नाट्यकला शिकवण्यासाठी आता अनेक विद्यालये, खासगी संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. पण दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय हे सर्वांच्या केंद्र आणि अग्रस्थानी आहे.
त्याचे कारणही तसेच आहे. कारण भारतातील एकूण कलेचा आढावा घेणारे, अभिनया सोबतच लेखन, दिग्दर्शन, नृत्य, गायन याचे धडे देणारे आणि एकूण नाट्य निर्मिती प्रक्रिया शिकवणारे हे विद्यालय आहे. इथे देशभरातील अनेक दिग्गज मागर्दर्शनासाठी येतात. शिवाय विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी सादरीकरणाचे मुक्त व्यासपीठ इथे आहे. मुख्य म्हणजे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने अत्यंत माफक शुल्कात इथे तुम्हाला शिक्षण घेता येते.
(वाचा: PSI Exam Details: पीएसआय व्हायचंय? वाचा परीक्षेपासून पोस्टिंग पर्यंत सविस्तर माहिती…)
थोडक्यात इतिहास:
संगीत नाटक अकादमी या संस्थेने १९५९ मध्ये दिल्ली येथे ‘एनएसडी’ची स्थापना केली. नाट्यकलेला एक व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने केंद्रीय स्तरावर याची बांधणी करण्यात आली होती. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष होते. अल्पवधीतच या संस्थेला इतके यश मिळाले की १९९७ मध्ये याला विद्यालयाचे स्वरूप आले. या विद्यालयातून १९६१ मध्ये पहिली बॅच उत्तीर्ण झाली. या विद्यालयाची सुरुवात अगदी छोट्या जागेतून झाली होती पण पुढे पुढे त्याचा विस्तार होत गेला आणि दोन भव्य नाट्यगृहांची व्यवस्था असलेले एनएसडी दिल्ली येथे उभे राहिले.
पुढे १९७५ मध्ये ‘एनएसएडी’ने स्वायत्ततेचा दर्जा मिळवला. एनएसडी मधून दिले जाणारे शिक्षण इतके दर्जदार होते की १९९९ मध्ये ‘एनएसडी’ आपला पहिला राष्ट्रीय नाट्य महोत्सव, ‘भारत रंग महोत्सव’ म्हणून आयोजित केला, जो आजही सुरु आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे नाव आज जगभरात पोहोचले आहे. २००८ मध्ये त्यांनी आपला सुवर्ण महोत्सव म्हणजेच पन्नास वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अभिमानाची गोष्ट म्हणजे या इतक्या मोठ्या विद्यालयाचे संचालन एका मराठी कलाकारानेही केले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी २०१३ मध्ये एनएसडीचे अध्यक्षपद भूषवले. पुढे पाच वर्षे ते अध्यक्षपदी राहिले आणि मग २०२० मध्ये अभिनेते परेश रावल यांची अध्यक्षपदी निवड झाली.
‘तो’ दर्जा नाकारला..
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची झपाट्याने होणारी प्रगती पाहून १६ मार्च २००५ रोजी भारत सरकारने ‘एनएसडी’ला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला . पण हा दर्जा थिएटरसारख्या सर्जनशील क्षेत्रात मिळणाऱ्या स्वातंत्र्यावर बंधन आणू शकतो अशी शंका व्यक्त करत २०१० मध्ये एनएसडी सोसायटीने डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा रद्द करण्याची मागणी केली, त्यानुसार २०११ मध्ये तो रद्द करण्यात आला.
‘एनएसडी’ मध्ये शिकलेले काही दिग्गज नट..
ओम पुरी, सई परांजप्ये, नसीरुद्दीन शाह, रोहिणी हट्टंगडी, राज बब्बर , अन्नू कपूर, पंकज कपूर, सतीश कौशिक, अनुपम खेर, आलोक नाथ, नीना गुप्ता, रत्ना पाठक, इरफान खान, पियुष मिश्रा, आशिष विद्यार्थी, अतुल कुलकर्णी, स्वानंद किरकिरे, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी.
(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)