हायलाइट्स:
- राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढलाः राज ठाकरे
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर काँग्रेसवर निशाणा
- रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला, या व्यक्तव्याचा पुनरुच्चार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुन्हा एकदा टीका केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही यावर भाष्य केलं आहे.
१९९९पर्यंत केवळ जातीचा अभिमान होता; राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीवरून एकमेकाचा द्वेष वाढला, असं वक्तव्या राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर पुण्यातही राज यांनी या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. त्यावर रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे. तसंच, राज ठाकरेंच्या शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, असं सूचक वक्तव्यही रोहित पवारांनी केलं आहे.
वाचाःछापा न टाकण्यासाठी खंडणीचे टार्गेट; परमबीर सिंह यांच्यावर आणखी एक गुन्हा
रोहित पवार ट्वीट करत म्हणतात, राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लाव रे तो व्हिडिओ…च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्यानं भाजपचे भले भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणयचं असेल तर एकच पर्याय होता. तो म्हणजे जातीयवाद वाढवणं. म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज ठाकरेंच्या बोलण्याचा अर्थ निघतोय, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुण्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. आधी प्रत्येकाला जातीबद्दल अभिमान वाटायचा, ‘राष्ट्रवादी’च्या स्थापनेनंतर इतर जातींचा द्वेष करणे सुरू झाले, हे सर्वांना माहीत आहे. मी केवळ बोललो. २० वर्षांमध्ये शाळा, कॉलेज, मित्रांमध्ये जाती आल्या. आपल्याला उत्तर प्रदेशप्रमाणे जातीचा महाराष्ट्र करायचा आहे का,’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.
वाचाः आत्महत्येचा इशारा देणाऱ्या देवरेंच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार