हायलाइट्स:
- महिलेच्या तक्रारी प्रकरणी संजय राठोड यांना क्लीनचिट.
- राठोड यांच्याविरुद्ध तक्रार केली नसल्याचा महिलेचा जबाब.
- जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.
यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार पोस्टाद्वारे घाटंजी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष चौकशी पथक नेमण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून चौकशीअंती राठोड यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. ( Sanjay Rathod Yavatmal Case Update )
वाचा: तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल!; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा
यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासाचा तपशील दिला. माजी मंत्री तथा शिवसेना आमदार आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध आपण कोणतीही तक्रार केलेली नाही. हा खोडसाळपणा आहे, असे महिलेने आपल्या जबाबात म्हटले आहे, अशी माहिती डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. त्यामुळे संबंधित प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीनचिट मिळाला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाचा:गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा; संभाजीराजे भडकले
नेमकं काय घडलं होतं?
घाटंजी तालुक्यातील एका महिलेने पोस्टाद्वारे लेखी तक्रार घाटंजी पोलीस स्टेशनसह पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी घटनेची गंभीर दखल घेत अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात एसआयटी नेमली होती. पहिल्या दिवशी महिलेने वडिलांची प्रकृती बरोबर नाही. माझी मनस्थिती बरोबर नाही, असे सांगून जबाब देण्यास टोलवाटोलवी केली. त्यानंतर गेल्या शनिवारी (१४ ऑगस्ट) ही महिला विशेष चौकशी पथकासमोर आली. या महिलेचा जबाब इन कॅमेरा नोंदविण्यात आला. आपण आमदार संजय राठोड यांच्याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यावरील स्वाक्षरी माझी नाही. पतीचे नावही चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे. कुणीतरी हा खोडसाळपणा केला आहे, असे महिलेने आपल्या जबाबात नमूद केले. तर,आमदार संजय राठोड यांचाही जबाब नोंदविण्यात आला असून, त्यांनी आरोप फेटाळले आहे. आता पोलीस अधीक्षकांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली असून राठोड यांच्याविरुद्धच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाचा: ‘ती’ ऑडिओ क्लिप: नीलेश लंके भेटल्यानंतर अण्णांनी घेतली ‘ही’ भूमिका