हायलाइट्स:
- भाळवणी कोविड केअर सेंटरमध्ये हरिनाम सप्ताह.
- इंदुरीकर यांनी केले आमदार नीलेश लंकेंचे कौतुक.
- टीकेकडे दुर्लक्ष करून यशाकडे वाटचाल करीत रहा!
नगर: पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी लंके यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो, तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,’ असा सल्लाच इंदुरीकरांनी लंके यांना दिला. ( Indurikar Maharaj Praised Mla Nilesh Lanke )
वाचा:‘ती’ ऑडिओ क्लिप: नीलेश लंके भेटल्यानंतर अण्णांनी घेतली ‘ही’ भूमिका
आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. तेथे सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कीर्तन करण्यासाठी इंदुरीकरांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कीर्तनातून समाज प्रबोधन करतानाच इंदुरीकर यांनी लंके यांचे कौतूक केले. कोविड सेंटरच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या रुग्णसेवेचेही त्यांनी कौतूक केले. ते म्हणाले, ‘राज्यातील बहुतांश आमदार-खासदार साखर स्रमाट, शिक्षण सम्राट तर कोणी उद्योगपती आहेत. मात्र, त्यांना कोणाला असे सेवाभावी वृत्तीचे कोविड सेंटर उभारण्याचे सूचले नाही. ते काम लंके यांनी करून दाखविले. राज्यातच नव्हे तर देश-विदेशात त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. येथून बरा झालेला प्रत्येक रुग्ण लंके यांना आशीर्वाद देत आहे. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे आशीर्वादाचे शब्द लंके यांच्यासाठी अमृतासमान आहेत. भाळवणी येथील कोविड सेंटरमधून २२ हजार रुग्णांना बरे करणारे आमदार लंके हे देवदूत आहेत. याच आशीर्वादाच्या जोरावर लंके पुढील २५ वर्षे राजकारणात सहज टिकून राहतील. एवढी लोकप्रियता मिळूनही लंके यांचे पाय जमिनीवर आहेत. तालुक्यात ते सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वावरत आहेत. कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत, याचे फळ त्यांना नक्की मिळणार आहे’, असेही इंदुरीकर म्हणाले.
वाचा:आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार
नीलेश लंके यांच्या विरोधकांचा इंदुरीकरांनी समाचार घेतला व लंके यांना सल्लाही दिला. ते म्हणाले, ‘हत्ती गावात आला की त्याच्यावर कुत्री भुंकत असतात. परंतु हत्ती आपली चाल बदलत नाही तो ध्येयाकडे चालत राहतो. त्यामुळे लंके तुमच्यावर कोणी कुत्री भुंकत असली तर तुम्ही त्याकडे लक्ष ने देता तुमची यशाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल सोडू नका.’
वाचा: ‘महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय तिच्या म्हणण्याला किंमत येते कुठे?’